मीरा भाईंदरमधील दुकाने, व्यवसाय आता रोज खुले ठेवण्यास आयुक्तांनी दिली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:58 PM2020-08-16T13:58:07+5:302020-08-16T13:58:14+5:30
नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये हॉटस्पॉट वगळता महापालिकेने सम - विषम पद्धत आता बंद करून सोमवार पासून दुकाने - व्यवसाय नियमित सुरु करण्यास परवानगी दिली आहे . आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी तसे लेखी आदेश शनिवारी जारी केले . आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह शहरातील व्यापारी वर्ग आदींनी याची मागणी केली होती. दुकाने नियमित सुरु होणार असली तरी नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जबाबदारीने मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे .
मीरा भाईंदर मध्ये 11 जुलै पासून दुकानांना सम विषम पद्धतीने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली . कोरोनाच्या संसर्गाचामुळे मार्च अखेरीस पासून भाजीपाला , दूध , किराणा, औषधे आदी अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील व्यवसाय , दुकाने , बाजार आदी सर्व तीन महिन्यां पेक्षा जास्त काळ बंद आहे . शहरातील स्टील उद्योग तसेच अनेक लहान मोठे कारखाने बंद होते .
यामुळे सगळ्यांचेच मोठे आर्थिक नुकसान झालेले असून लहान - सहान नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे. कोरोनाची लागण सुरु होऊन चार महिने उलटले असून आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज शंभरच्या आसपास जात आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे . पालिकेने घरोघरी सर्वेक्षण चालवले आहे . शिवाय झटपट अशी अँटीजेन चाचणी सुरु केली गेली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये व त्याची लागण होऊ नये यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतानाच शहरातील नागरिकांची आर्थिक घडी पुन्हा बसवण्याची नितांत आवश्यकता आहे . नागरिकांच्या हाताला काम नाही मिळाल्यास अनेकांवर उपासमारीची पाळी येईल आणि यातून भयंकर असे सामाजिक प्रश्न उभे राहतील अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मांडली .
आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सर्व बाबींचा सारासार विचार करून मीरा भाईंदर मधील सर्व व्यवहार पूर्व पदावर आणण्यासाठी सुधारित आदेश काढून सम विषम पद्धत बंद करावी . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिशन बिगिन अगेन धोरणाचे पालन केले जावे . गर्दी व संसर्गाची धास्ती आहे आणि शासनाने देखील निर्बंध कायम ठेवले आहेत अश्या आस्थापना वगळून शहरातील सर्व दुकाने - व्यवसाय नियमितपणे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली होती . या शहरातील व्यापारी वर्ग आदींनी देखील सम विषम पद्धत बंद करा अशी मागणी चालवली होती .
आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी आदेश काढून सोमवार 17 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळात सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे . परंतु कोरोना हॉटस्पॉट मधील राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे . या मुळे आता सर्व दुकानदारांना सरसकट दुकाने सुरु ठेवता येणार आहेत .
शासन, महापालिका कोरोना संसर्ग रोखण्यासह रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत . बहुतांश नागरिक देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे , गर्दी न करणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी जबाबदाऱ्या घेत आहेत . पण जे बेजबाबदार लोक निर्देश पळत नाहीत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई देखील करणे आवश्यक आहे असे सरनाईक म्हणाले .