अंबरनाथमध्ये होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची केली आयुक्तांनी पाहणी
By पंकज पाटील | Published: October 21, 2023 07:06 PM2023-10-21T19:06:05+5:302023-10-21T19:08:12+5:30
अंबरनाथमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवेदकर यांनी आज केली.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवेदकर यांनी आज केली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने त्या कामाचा आढावा देखील त्यांनी घेतला.
अंबरनाथच्या लोकनगरी जवळ फार्मिंग सोसायटीच्या आरक्षित भूखंडावर जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्या संदर्भातील सर्व प्रक्रिया सुरू असतानाच यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने या वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या वर्ग खोल्या, डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था आणि उपचारासाठी कोणते रुग्णालय उपयुक्त ठरेल याची माहिती आज आयुक्तांनी घेतली. डेंटल कॉलेज अंबरनाथ, ग्रामीण रुग्णालय बदलापूर, मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर, महिला प्रसूती गृह उल्हासनगर, बी.जी. छाया रुग्णालय अंबरनाथ येथे पाहणी केली. पहिल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात या रुग्णालयाची मदत घेऊन त्या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे.
अंबरनाथच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून जोपर्यंत महाविद्यालय उभारले जात नाही तोपर्यंत भाडेतत्त्वावर डेंटल कॉलेजची जागा ताब्यात घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी अवधी लागणार असल्यामुळे मेडिकल कॉलेजचे काम थांबू नये आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर वैद्यकीय सेवा देखील सुरू राहावी या अनुषंगाने उपलब्ध साधन सामग्रीचा वापर केला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवेदकर यांच्यासह आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, प्रांत अधिकारी विजय शर्मा, तहसीलदार प्रशांती माने, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर संतोष वर्मा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.