लेटलतिफ कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी घेतली झाडाझडती, केडीएमसीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:01 AM2020-03-05T00:01:53+5:302020-03-05T00:02:02+5:30
राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. सोबतच दररोजच्या कामाची वेळ वाढवली आहे.
कल्याण : राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. सोबतच दररोजच्या कामाची वेळ वाढवली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली असताना, अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे आयुक्तांनी बुधवारी केलेल्या आकस्मिक भेटीतून उघड झाले आहे. जे कर्मचारी उशिरा आले, त्यांचे हाफ डे लावण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पालिकेचे जवळपास ३0 टक्के कर्मचारी वेळेत त्यांच्या कामावर हजर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिका मुख्यालयात बुधवारी कामाची वेळ सुरू होण्यापूर्वीच आले. नियमानुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात सकाळी ९.४५ वाजता हजर राहणे आवश्यक आहे. नेमक्या त्याचवेळी आयुक्तांनी विविध खात्यांत जाऊन पाहणीला सुरुवात केली. त्यावेळी अनेक खात्यांतील कर्मचारी व अधिकारी कामावर हजर झालेले नव्हते. अन्य विभागांमध्ये ही वार्ता पसरताच सगळ्यांची एकच पळापळ झाली.
आयुक्तांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना शिस्त व सुप्रशासनावर भर देण्याची ग्वाही दिली होती. अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत कार्यालयात हजर राहणे, हा शिस्त आणि सुप्रशासनाचा एक भाग आहे. ज्या खात्यांमध्ये अधिकारी, कर्मचारी वेळेवर आले नव्हते, त्यांचे वेळेवर न येण्याचे कारण सबळ असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, जे विनाकारण उशिरा आले, त्यांचा हाफ डे लावण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.
अनेक अधिकारी साइट व्हिजिटच्या नावाखाली परस्पर घरी निघून जातात. सोमवारी आयुक्तांची आढावा बैठक असते. काही अधिकारी तर मुख्यालयाचे तोंड केवळ या आढावा बैठकीच्या दिवशीच पाहतात. अनेक अधिकारी स्थायी समितीच्या बैठकीसही वेळेवर येत नाही, तसेच महासभेलाही अनुपस्थित राहतात. त्यामुळे त्यांच्या खात्याशी
संबंधित एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर सदस्याला मिळत नाही. अशा सर्वच मुद्यांवर आयुक्तांकडून आता समाचार घेतला जाणार आहे.