आयुक्त नुसते बोलघेवडे; राजकीय पक्षांचे टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:20 PM2018-12-12T23:20:00+5:302018-12-12T23:20:15+5:30
सीएम चषकासाठी बोस मैदान भाजपाला आंदण
मीरा रोड : मंडपाचे संपूर्ण शुल्क वसूल करू अन्यथा मंडप उखडून टाकू सांगणारे महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू होऊनही काहीच कारवाई केली नाही. पालिकेचे मैदान आंदन देतानाच मंडपाचे काही लाखांचे शुल्क बुडवणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली आयुक्त फक्त बोलघेवडेपणा करत असल्याची टीका काँग्रेस, मनसे, जनता दल (से.),राष्ट्रवादीसह काही सामाजिक संस्थांनी केली आहे. काँग्रेसने तर निवेदन देऊन संबंधित प्रभाग अधिकाºयावर कारवाईची मागणी केली आहे.
शाळा व संस्थांच्या मागणी अर्जांना प्रशासनाने दबावाखाली केराची टोपली दाखवली. तब्बल १ ते २९ डिसेंबर दरम्यान भाजपाला सीएम चषकासाठी मैदान भाड्याने दिले. परंतु २९ दिवसांऐवजी केवळ सात दिवसाचेच दोन लाख ६२ हजार इतके मंडपांचे शुल्क भाजपाने भरले असून तब्बल २२ दिवसांचे शुल्कच भरले नाही. बॅनरच्या परवानगीमध्येही पालिकेने असाच घोटाळा करून पालिकेचे काही लाखांचे आर्थिक नुकसान चालवले आहे.
आधीच सलग मैदान भाड्याने दिल्याने मुलांना खेळण्यास मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाºयांचा संदर्भ देऊन आयुक्तांनी मैदान पुन्हा भाड्याने देण्यासाठी खुले केले का ? असा प्रश्न केला जात आहे. आठ डिसेंबरला भाजपाने मैदान आरक्षण केलेले नसतानाही त्या दिवशी कार्यक्रम घेण्यात आला. मनसेने पालिकेत क्रिकेट खेळून आयुक्तांचा निषेध केला. आयुक्तांनीही मंडपाचे सर्व शुल्क वसूल करू अन्यथा मंडप काढून टाकू असा गळा काढला होता. पण त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेविका सारा अक्रम व रुबिना शेख , प्रशांत बहुगुणा, प्रकाश नागणे यांनी अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांना भेटून निवेदन दिले. प्रशासन भाजपाच्या दबावाला बळी पडून शुल्क बुडवत आहे.
आमदाराकडून भाडे वसुलीची धमक नाही
आयुक्त हे मंडप शुल्क वसुल करण्याच्या निव्वळ थापा मारत असून पालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत असा आरोप काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला.
नागरीकांकडून पैसे वसूल करणाºया आयुक्तांची सत्ताधारी भाजपा आमदाराकडून पालिकेचा महसूल वसुल करण्याची हिमत नाही. असा लाचार आयुक्त पाहिला नाही अशी झोड जनता दल ( से.) चे माजी नरसेवक मिलन म्हात्रे यांनी उठवली आहे.
नियमांचे उल्लंघन केले जात असून २२ दिवसांचे मंडपाचे शुल्कही वसूल केले नाही. हा महसूल त्वरित वसूल करुन जबाबदार अधिकाºयावर कारवाईची मागणी शिष्टमंडळाने केली.
बांगड्या भेट म्हणून देणार
राष्ट्रवादी काँग्रे्रसच्या प्रदेश सचिव पौर्णिमा काटकर यांनी आयुक्तांना बांगड्या भेट देऊ असे म्हटले आहे. सत्ताधाºयांची तळी उचलण्यासाठी बसवलेल्या आयुक्तांकडून नागरिकांनी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे असा टोला मनसेचे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी लगावला आहे. मनसे, सत्यकाम फाऊंडेशनसह अनेकांनी आयुक्त व प्रभाग अधिकाºयावर कारवाईची तक्रार सरकारपर्यंत केली आहे.