सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलीस निरीक्षकांचा पोलीस आयुक्त मधुकर पांडेनी केला सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:33 PM2024-06-12T19:33:08+5:302024-06-12T19:33:23+5:30
सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- पोलीस आयुक्तालयात दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात येते. मे महिन्यात ३ गुन्ह्यांची उकल केल्याप्रकरणी ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सत्कार केला आहे. पेल्हारच्या सायरा बानूच्या हत्याप्रकरणाचा तपास केल्याबद्दल पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना गौरविण्यात आले. जबरी चोरी आणि वाहन चोरी असे एकूण ११ गुन्ह्यांची उकल केली म्हणून गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना तर २० लाखांचे अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले.
पेल्हार येथील अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडून आरोपीला ७२ तासांत दिल्ली येथून अटक करून या गुन्ह्याची उकल पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला घटनास्थळी निरोध आणि स्प्रे मिळाला होता. धानिवबाग परिसरातील एका मेडिकलमधून आरोपीने या वस्तू घेतल्याचे सीसीटीव्हीमधून निष्पन्न झाले. या मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी मतदार याद्या पोलिसांनी प्राप्त केल्या. महिलेच्या पेहरावावरून मुस्लिम वाटत असल्याने मुस्लिम महिलांच्या नावाची शॉर्टलिस्ट तयार केली. त्यानंतर प्रत्येक घरे शोधण्यास सुरुवात केली. धानिवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्लाह शाह यांची पत्नी ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याने पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती मिळाली. त्यांना भेटून पोलिसांनी फोटो दाखविल्यावर त्यांची पत्नी सायरा (३४) हिचा असल्याचे ओळखले. पोलिसांनी मेडीकलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यावर भाचा नजाबुद्दीन सम्मी (२१) हा असल्याचे सांगून दोघांचे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली. गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम दिल्लीला गेली. तो एका बेकरीमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाल्यावर रात्रभरात ९० ते १०० बेकऱ्या तपासून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने महिलेसोबत अनैतिक संबंधातून वाद झाल्याने २७ मे रोजी नालासोपाऱ्यात येऊन चाकूने गळा चिरून व छातीत खुपसून हत्या करून पळून गेला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीममधील पोलिसांनी जबरी चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरिफ शेख या आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून २ जबरी चोरी आणि ९ वाहन चोरी असे एकूण ११ गुन्ह्यांची उकल केल्याने याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना सर्वोत्कृष्ट तपासाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर १५ मे रोजी दुपारी ठाणे घोडबंदर रोडवर चेनागाव येथील हॉटेल द्वारकाच्या समोर आरोपी शोएब मेनन (३३) आणि निकोलस टायटस (३९) यांच्याकडे सुमारे २० लाख रुपये किंमतीचे १ हजार ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने ३६ लाख ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले.