शिलाई मशीन खरेदी घोटाळा प्रकरणी आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:43 PM2019-12-13T13:43:47+5:302019-12-13T13:44:14+5:30
बाजारात ६८०० रुपयांची मिळणारी मशिन पालिकेने ११ हजार ६०० ला खरेदी केली.
मीरारोड - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुर्वीच्या धोरणाला परस्पर तिलांजली देतानाच बाजार भावा पेक्षा जास्त दराने महिला बालकल्याण समितीने शिलाई मशीन खरेदी केल्याचा प्रकार वादग्रस्त ठरला आहे. गंभीर बाब म्हणजे ठेकेदाराचा शिलाई मशिन वितरणाचा व्यवसाय नसताना ठेका दिले गेला. आता या प्रकरणी अखेर महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून नोटीस बजावून संबंधितांना खुलासा सादर करण्यास सांगीतले आहे.
गरीब - गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणुन शिलाई मशीन खरेदीचा ठराव झाल्या नंतर निविदा प्रक्रिया होऊन ३० आॅगस्ट रोजी मशिन खरेदीचे कार्यादेश श्री साई श्रद्धा महिला संस्थेला दिले. उषा कंपनीच्या मार्वेला मॉडेलच्या १७० मशीन खरेदीसाठी प्रती मशिन ११ हजार ६०० रुपये ठेकेदारास अदा केले गेले. त्यासाठी साडे एकोणीस लाख रुपये खर्च होता.
वास्तविक पूर्वी पासून समितीच्या ठरलेल्या धोरणा नुसार प्रत्येक नगरसेवकास त्याच्या प्रभागात एक मशिन गरजु महिलेस वाटप करण्यास दिली जाते. पालिकेत ९५ नगरसेवक असताना मशिन खरेदी मात्र तब्बल १७० केल्या गेल्या. बहुतांश नगरसेवकांना प्रत्येकी एक शिलाई मशिनच देण्यात आली असताना महापौर डिंपल मेहतांनी मात्र ५० पेक्षा जास्त मशिन मागुन घेत वाटल्या. विधानसभा निवडणुक असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने जास्त मशिन खरेदी करुन केला गेल्याचा आरोप केला गेला.
बाजारात ६८०० रुपयांची मिळणारी मशिन पालिकेने ११ हजार ६०० ला खरेदी केली. आॅनलाईन विक्रीची किरकोळ किंमत ७ हजार २००च्या घरात होती. मशिनच्या पॅकिंग खोक्यावर देखील सर्व करांसहितची किरकोळ छापील किंमत ९ हजार ८५० इतकी होती. त्यामुळे सदर मशिन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका कुसुम गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.
विशेष म्हणजे ज्या ठेकेदारास मशिन पुरवठ्याचे कंत्राट दिले त्यांचा सकस आहार, गणवेश, स्टेशनरी, ज्वेलरी मेकिंग चा व्यवसाय असल्याचे नमुद आहे. त्यामुळे पालिकेने सदर मशिन खरेदीसाठी थेट उषा कंपनी व वितरकां कडुन देखील दर का मागवले नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सदर मशिन खरंच मुळ कंपनीची आहे की एसेंबल केलेली आहे ? अशी शंका देखील पुर्वीचा पालिका अनुभव पाहता केली जात आहे.
त्या अनुषंगाने आयुक्त बालाजी खतगावकर यांनी निवड समितीतल्या सदस्यांसह संबंधित विभागास नोटीस बजावून सदर मशिन खरेदी प्रकरणी खुसाला सादर करण्यास सांगितले आहे. महिला बालकल्याण विभागाचे लिपीक यांना देखील शिलाई मशिन प्रस्ताव व निवीदा तुमच्या मार्फत सादर केल्याने खुलासा देण्यास आयुक्तांनी नोटीसीत नमुद केले आहे. त्यामुळे विभागासह निवड समिती या प्रकरणी काय खुलासा देते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणी चौकशीचे आदेश देत अतिरीक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.