रस्तेबाधितांची आयुक्त घेणार भेट, नगरसेवकाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 04:21 AM2018-04-14T04:21:07+5:302018-04-14T04:21:07+5:30
कल्याण-मलंग रस्त्याच्या विकासाचे काम केडीएमसीने हाती घेतले असले तरी या रस्त्यामुळे बाधित झालेल्या १५० जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही.
कल्याण : कल्याण-मलंग रस्त्याच्या विकासाचे काम केडीएमसीने हाती घेतले असले तरी या रस्त्यामुळे बाधित झालेल्या १५० जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याप्रकरणी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली असून, ते स्वत: सोमवारी बाधितांची भेट घेणार आहेत.
मलंग रस्त्याच्या विकासासाठी केडीएमसी ४५ कोटी रुपये खर्च करत आहे. परंतु, या रस्त्यात बाधित झालेल्यांना महापालिकेने पर्यायी जागा दिलेली नाही. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे ‘रस्तेबाधितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन विरले हवेत’ या शीर्षकाखाली वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ११ एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाटील यांनी आयत्यावेळी हा विषय उपस्थित केला.
मलंग रस्त्याच्या बाधितांचा मुद्द्याप्रकरणी तोडगा न निघाल्यास १५ दिवसांनंतर आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने त्याची काय दखल घेतली, याचा खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यावर सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाने खुलासा करावा, असे आदेश दिले. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले की, ‘मलंग रस्त्याच्या बाधितांची भेट आयुक्त येत्या सोमवारी प्रत्यक्ष तेथे जाऊन घेणार आहेत.’ त्यावर पाटील म्हणाले, ‘आयुक्तांनी बाधितांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन करायचे की, मागे घ्यायचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल.’
>पाणीप्रश्न न सुटल्यास कामकाज बंद पाडणार
२७ गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे ४५ लाख रुपयांचे काम प्रशासनाने मंजूर केले आहे. मात्र, या कामाचा कार्यादेश का दिला जात नाही. मागील १० महिन्यांपासून या विषयी सदस्य म्हणून विचारणा करत आहे, त्यावर प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे, असा मुद्दाही अपक्ष नगरसेवक पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर हा विषय चर्चेला आयुक्तांकडे आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी दिले. नगरसेवक पाटील यांनी विषय मार्गी लागला नाही तर या पुढच्या स्थायी समितीच्या सभेचे कामकाज चालू देणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. सभापती दामले यांनी त्यावर आपण चर्चा करून निर्णय घेऊ शकतो. सभा सदस्यांच्या विरोधात नाही. त्यामुळे कामकाज बंद पाडू नये. तसे झाल्यास निर्णयच होणार नाही. त्यामुळे कामकाज बंद पाडू नका, असे आवाहन केले.याप्रकरणी आताच चर्चा करू, असे दामले यांनी स्पष्ट केले. मात्र काम झाले नाही तर कामकाज बंद पाडण्याच्या मुद्यावर मी ठाम आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या इशाºयाला नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी समर्थन दिले.