उत्तन समुद्र किनारा स्वच्छतेसाठी तरुणांसोबत आयुक्त सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:56+5:302021-07-11T04:26:56+5:30
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनारी काही महिने स्वच्छता अभियान राबविणाऱ्या ‘फोर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या मोहिमेत रविवारी ...
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनारी काही महिने स्वच्छता अभियान राबविणाऱ्या ‘फोर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या मोहिमेत रविवारी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले सहभागी झाले. हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी यापुढे महापालिकाही सक्रिय सहभाग घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
उत्तन येथील वेलंकनी तीर्थ मंदिरालगत असलेला समुद्रकिनारा हा शहरातील नागरिकांसाठी पर्यटन व विरंगुळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली सोनेरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपी दारूच्या बाटल्या येथेच फोडतात वा टाकून जातात. त्यामुळे काचेचे तुकडे सर्वत्र पडलेले आढळतात. यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या लहान-मोठ्यांचा पाय कापूर इजा हाेण्याचा धाेका असताे. कचरापेट्यांचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने बेशिस्त लोक कचरा उघड्यावर टाकतात. याशिवाय भरतीच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात कपडे, प्लास्टिक आदी कचरा वाहून किनारी येतो. हा कचरा वाळूत अडकून पडतो. त्यामुळे सुंदर निसर्गरम्य, सोनेरी वाळूचा हा किनारा अस्वच्छतेच्या जाळ्यात अडकलेला आहे. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांच्या फोर फ्यूचर इंडिया या संस्थेतर्फे सात ते आठ महिन्यांपासून नियमित शनिवार, रविवारी हा किनारा साफ करण्यात येत आहे. शनिवारी या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे सहभागी झाले होते.
अनेक महिने नियमित राबवीत असणाऱ्या या उपक्रमाची प्रशंसा करीत उपक्रम सुरू करणाऱ्या हर्षद ढगे, सिद्धेश कांबळे, भावेश सुतार, पराग जाधव, साक्षी गुप्ता आदी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत या संस्थेकडून उत्तन, जुहू, दानापाणी, खारदांडा, गोराई, अर्नाळा, मनोरी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
-----
समुद्रकिनारी कचरा करणाऱ्यांना दंड
पर्यावरण व पर्यटनाच्या दृष्टीने वेलंकनी समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी जनजागृतीचे फलक व कचऱ्याच्या डब्याचे नियोजन करण्यात येईल. समुद्रकिनाऱ्यावर कचरा करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंड ठोठावण्यात येईल. उत्तन येथे भविष्यात होणाऱ्या सर्व स्वच्छता मोहिमेस महापालिकेकडून पूर्णपणे मदत केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.