माजिवडा उड्डाणपूल, आनंदनगर, कासारवडवली नाका येथील रस्ते दुरुस्ती कामाची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी
By अजित मांडके | Published: July 15, 2024 09:03 PM2024-07-15T21:03:09+5:302024-07-15T21:03:18+5:30
यावेळी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, संजय कदम आदी उपस्थित होते.
ठाणे : पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सायंकाळी केली.
माजिवडा उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचे काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली. रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतुक योग्य करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही राव यांनी केली. यावेळी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, संजय कदम आदी उपस्थित होते.
माजिवडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीचे कामही यावेळी आयुक्त राव यांनी पहिले. त्यानंतर, मेट्रो द्वारे आनंदनगर नाका आणि कासारवडवली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कासारवडवली नाका येथील बरिकेदिंगचे क्षेत्र कमीत कमी करून हा नाका मोकळा करावा. त्यामुळे उजवीकडे वळणारे, यूर्टन घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. येत्या दोन ते तीन दिवसात येथील वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.