आयुक्तांकडून शिवसेनेच्या स्वागत मंडपावर कारवाई; पक्षपातीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:01 AM2019-09-14T00:01:13+5:302019-09-14T00:01:19+5:30

एक हजार ७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन

Commissioner takes action on Shiv Sena's welcome board; An allegation of bias | आयुक्तांकडून शिवसेनेच्या स्वागत मंडपावर कारवाई; पक्षपातीपणाचा आरोप

आयुक्तांकडून शिवसेनेच्या स्वागत मंडपावर कारवाई; पक्षपातीपणाचा आरोप

Next

मीरा रोड / भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने निरोप दिला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ३१६ सार्वजनिक, तर एक हजार ७५६ खाजगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर, यंदाच्या गणेशोत्सवात २० हजार ५६९ गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पहाटे ५ वाजता जेसल पार्क धक्का येथे शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

दरम्यान, पोलिसांनी लेखी कळवूनही महापालिका आयुक्तांनी विसर्जनमार्गावरील खाद्यपेयांचे स्टॉल, स्टेज, मंडप हटवले नव्हते. भाजपचे मंडप लागले असताना आयुक्तांनी मात्र जेसल पार्क येथे फक्त शिवसेनेच्या स्वागत मंडपावर कारवाई करायला लावल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा पक्षपातीपणा असून आयुक्त भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील खाड्या, तलाव, समुद्रकिनारे, नदी व एक कृत्रिम तलाव अशा एकूण २३ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. मोठ्या मूर्तींचे विसर्जन भार्इंदर पूर्व व भार्इंदर पश्चिम धक्का येथे केले जात असल्याने पालिकेने हायड्रोलिक क्रेन आदी यंत्रणा ठेवली होती. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

विसर्जनाच्या मार्गावर मात्र पोलिसांनी पत्र देऊनही सर्रास बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल, राजकीय स्टेज- मंडप आदी लागले होते. आधीच रस्ते अरुंद त्यातच भार्इंदर पूर्व व पश्चिम मार्गावर मिरवणुका तसेच भाविकांची मोठी गर्दी होत असतानाही महापालिकेने मात्र याकडे सर्रास डोळेझाक केली. यामुळे स्टॉलवर गर्दी होऊन नागरिक रस्त्यावर उभे राहत असल्याने रहदारीला अडथळा होत होता.
विशेष म्हणजे स्टॉलधारकांमुळे होणारे उष्टे आणि कचरा सर्वत्र पसरलेला असल्याने कचरापेटीचे स्वरूप आले होते. पालिकेनेही स्टॉलधारकांवर कचऱ्याची जबाबदारी निश्चित न करता सफाई कामगारांना जुंपून स्वच्छता करायला लावली.

एकीकडे पोलिसांनी विसर्जनमार्गावर मंडप, स्टेज, स्टॉल लावू नका म्हणून पत्र देऊनही त्यावर कारवाई न करणारे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी जेसल पार्क येथे मात्र शिवसेना शाखेच्या स्वागत कक्षाच्या मंडपावर कारवाई केली.या कारवाईला शिवसैनिकांनी विरोध करत केवळ शिवसेनेच्याच मंडपावर कारवाई का? अन्य पक्षांच्या मंडपांवर कारवाई का नाही, असे सवाल केले. परंतु, आयुक्तांनी शिवसेनेचा विरोध न जुमानता मंडप काढायला लावला.भाजपच्या सांगण्यावरून आयुक्तांनी कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेचे कामगार सेनेचे पदाधिकारी श्याम म्हाप्रळकर यांनी केला आहे. आयुक्त भाजपची तळी उचलण्याचे काम करत आहेत. महापालिकेचे आयुक्तपद हे कायदे-नियम आणि शहर व जनहिताने राबवले गेले पाहिजे. पण, खतगावकर मात्र आयुक्तपद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे राबवत असल्याची टीका केली.

शिवसेना शाखेसमोर कित्येक वर्षांपासून गणरायाला अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचा स्वागत मंडप लागतो. पण, स्थानिक भाजप नगरसेविकेने आयुक्तांकडून मंडप काढायला लावला. बाकी शहरभर मंडप, स्टॉल असताना फक्त शिवसेनेवर कारवाई करून सेनेची नाचक्की केली.- राजेंद्र डाकवे, उपशहरप्रमुख

Web Title: Commissioner takes action on Shiv Sena's welcome board; An allegation of bias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.