निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी आयुक्तांना धमकी
By admin | Published: February 18, 2017 04:25 AM2017-02-18T04:25:00+5:302017-02-18T04:25:00+5:30
निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी नवी मुंबई शिक्षक संघटनेचे कथित अध्यक्ष आशिष सावकारे (४५) यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल
ठाणे : निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी नवी मुंबई शिक्षक संघटनेचे कथित अध्यक्ष आशिष सावकारे (४५) यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना गुरुवारी धमकी दिली़ या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली़
ठाणे महापालिका आयुक्तांना धमकी देण्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजला असतानाच आपण शिक्षक संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून सावकारे (४५) या शिक्षकाने आयुक्तांच्या दालनातच त्यांना आव्हान देऊन धमकी दिली. निवडणूक ड्युटीचे काम रद्द करण्यासाठी त्याने आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेला.
सरकारी कामात अडथळा आणल्याने सुरक्षारक्षकांनी त्याला अटकाव केला. त्यांच्याशीही त्याने झटापट केली. या झटापटीनंतर ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकीही त्याने दिली़ या प्रकरणी पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक पी.एन. पाटील या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)