आयुक्तांनीच पुढाकार घेऊन फोडली संगणक चालकांच्या संपाची कोंडी ; १४ दिवसांनी संपकरी कर्मचारी हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 01:38 PM2018-02-05T13:38:06+5:302018-02-05T13:38:21+5:30
एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांची कामगार संघटना तर दुसरी कडे पालिका प्रशासन अश्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या संपकरी अस्थायी संगणक चालकांची अखेर आयुक्त डॉ . नरेश गीते यांनीच पुढाकार घेऊन कोंडी फोडली
मीरारोड - एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांची कामगार संघटना तर दुसरी कडे पालिका प्रशासन अश्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या संपकरी अस्थायी संगणक चालकांची अखेर आयुक्त डॉ . नरेश गीते यांनीच पुढाकार घेऊन कोंडी फोडली. शासनाला पाठवण्याच्या प्रस्तावास मंजुरी देतानाच प्रशासनाच्या ठरवलेल्या अटीशर्ती देखील मागे घेत संगणक चालकांना दिलासा दिला . यामुळे गेल्या १४ दिवसां पासून संपावर असलेले संगणक चालक आज सोमवारी कामावर हजर झाले .
मीरा भाईंदर महापालिकेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या संगणक चालकांची संख्या सध्या ६६ च्या घरात आहे . सोमवार २२ जानेवारी पासून या संगणक चालकानी आ. नरेंद्र मेहतांच्या अध्यक्षते खालील कामगार संघटनेच्या माध्यमातून अचानक संप सुरु केला होता . संपाच्या दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून बेकायदा संप सुरु केला तो बंद करून तात्काळ सेवेत हजर व्हा अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता . परंतु कर्मचाऱ्यांनी त्याला उत्तर न देता संघटनेने त्याचे उत्तर दिले होते .
गेल्या मे मध्ये महासभेने सर्वानुमते केलेल्या ठरावात संगणक चालक पालिका सेवेत कायम होई र्पयत त्यांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे नमूद केले होते . पण डिसेम्बर मध्ये प्रशासनाने सदर मुद्दा विखंडना साठी शासनाकडे पाठवल्याने संप करत असल्याचे संगणक चालक व संघटनेने म्हटले होते .
परंतु प्रशासनाने विखंडित करण्यास पाठवलेला मुद्दा योग्य असल्याचे स्पष्ट करत विखंडन साठी पाठवलेला प्रस्ताव मागे घेणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली . त्या नंतर शासनाने संगणक चालक यांच्या बद्दल मागवलेला हवा तातडीने पाठवावा असा मुद्दा संघटनेने उपस्थित केला .
आयुक्तां सोबत आ . मेहता , महापौर , उपमहापौर , सभापती आदींनी घेतलेल्या बैठकीत देखील संगणक चालक यांचा तोडगा निघाला नव्हता . अखेर उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी हा विषय हाताळण्यास घेत आयुक्तांशी चर्चा सुरु केली . गुरुवारी आयुक्त डॉ . नरेश गीते व वैती यांच्यात सकारात्मक चर्चा झाली . शुक्रवारी रात्री पुन्हा वैतीं सोबत भाजपा कामगार संघटनेचे प्रभाकर गायकवाड , श्रीकांत पराडकर आदींनी आयुक्त व उपायुक्त मुख्यालय यांच्याशी चर्चा केली . त्यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्या आधी हमीपत्र घेणे , परीक्षा घेणे आदी मुद्दे बाजूला ठेवत कर्मचाऱ्यांना शनिवार पासून हजर होण्यास सांगितले .
उपस्थित २८ कर्मचाऱ्यांनी देखील आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या कडे दिलगिरी व्यक्त करतानाच लेखी पत्र देखील दिले . संप केला त्या बद्दल माफी मागत पुन्हा परस्पर संप करणार नाही असे त्यात म्हटले होते. आयुक्तांनी देखील तुम्ही समस्या घेऊन माझ्या कडे यायला हवे होते असे सांगत जे उपस्थित आहेत त्यांनी कामावर हजर व्हा व जे आले नाहीत त्यांना सकाळी मला भेटून कामावर हजर व्हावे असे सांगतिले होते. या वेळी आयुक्तांनी बदल्या करण्याचा इशारा मात्र दिला .
शनिवारी सकाळी काही कर्मचारी हजर झाले . त्यांनी थम्ब इम्प्रेशन मध्ये हजेरी लावून कामाच्या ठिकाणी देखील बसले . परंतु काही वेळाने पुन्हा कामावर हजर होऊ नका असा आ. मेहतांचा निरोप आहे असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले . या वरून पुन्हा संप कर्मचाऱ्यांनी सुरु केला .
आदल्या दिवशीची भाजपाच्या उपमहापौर आणि कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी मध्यस्थी करून संपावर तोडगा काढला असताना आ . मेहतानीच त्यावर पाणी फिरवत संप सुरूच ठेवायला सांगितल्याने संगणक चालक चिंतीत झाले . शासनाला पाठवण्याच्या अहवालाचा मसुदा दाखवा व तो निश्चित करून स्वाक्षरी करू शासनास पाठवल्या शिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका आ . मेहतांनी घेतल्याचे सांगण्यात आले .
संपकरी संगणक चालक अडचणीत सापडले. आधीच संपाच्या काळातील मानधन त्यांना मिळणार नाही . अनेकांची स्थिती बेताची आहे . महत्वाचे म्हणजे ते कायम सेवेत नसल्याने संपा मुळे भविष्यात त्यांची अडचण वाढू शकते . त्यातच आयुक्तांनी कामावर विना अट हजर करून घेण्याची दाखवलेली तयारी व शासनास चालकांचे हित पाहून अहवाल पाठवण्याचे आश्वासन देऊन देखील संप सुटत नसल्याने कर्मचारी मात्र कात्रीत सापडले .
वास्तविक प्रशासनाने विखंडना साठी पाठवलेला मुद्दा कायदे - नियम नुसार योग्य असल्याचे अभ्यासू व्यक्तींचे मत आहे . तर शासना कडे पाठवण्याच्या अहवालाचा मसुदा दाखवून आयुक्तांनी सही करण्याच्या अटी वरून देखील प्रशासन नाराज होते . मुळात कर्मचारी सेवेत हजर नसताना शासनास त्यांच्या बद्दल पाठवला जाणारा अहवाल भविष्यात कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा ठरू शकतो अशी भीती होती .
आ. मेहता यांनी आयुक्त डॉ नरेश गीते यांना लक्ष्य केले असल्याने दालन बंद , परिवहन कमर्चारी संप , विविध तक्रारी चालवल्या जात आहेत . आयुक्तांची ज्या मार्गाने होईल त्या मार्गाने कोंडी करण्याचे प्रयत्न चालू असल्याने सध्या आयुक्त विरुद्ध आमदार असा उघड संघर्ष पेटला आहे . या वादातूनच संगणक चालकांचा संप देखील पेटता ठेऊन कामकाजात अडचणी आणून आयुक्तांना जेरीस आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती .
सत्ताधारी व संघटने कडून आडमुठेपणा केला जात असल्याची एकी कडे टीका होत असतानाच आज सोमवारी काही कर्मचारी कामावर हजर होण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा होती . कारण या कात्रीत त्यांची नोकरी तसेच पगार धोक्यात आला होता . तरी देखील आयुक्तांनी मात्र संगणक चालकांची कात्रीतून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला . शासनाला पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केलाच शिवाय प्रशासनाची कोणतीही अट न ठेवता कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर करून घेण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले . उपमहापौर वैती यांची मध्यस्थी महत्वाची ठरली . अखेर १४ दिवसांच्या संपा नंतर संगणक चालक आज पुन्हा पालिका सेवेत रुजू झाले .