कोरोना रुग्ण वाढू लागल्याने आयुक्त उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:54 AM2021-02-20T05:54:02+5:302021-02-20T05:54:02+5:30
कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. ...
कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे रस्त्यावर उतरले. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन या वेळी आयुक्तांनी केली. आयुक्तांच्या या अचानक पाहणी दौऱ्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे आदेश या वेळी महापालिकेच्या कारवाई पथकास आयुक्तांनी दिले.
महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत होती. गेल्या दोन दिवसांत ही संख्या शंभरीपार गेली आहे. राज्यात अन्य ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.
यासंदर्भात आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. कोरोना काळात मास्कचा वापर न करता फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू ठेवली होती. मास्कचा वापर न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करून सप्टेंबरपासून आतापर्यंत ५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्कचा वापर केला जात नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले जात नाही. त्यासाठी पुन्हा खबरदारी घेणे गरजेचे आहे. मोठे गर्दीचे कार्यक्रम टाळले पाहिजेत. मंगल कार्यालये आणि सभागृहे या ठिकाणी महापालिकेच्या कारवाई पथकाकडून पाहणी केली जाईल. गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. त्याचबरोबर मॉल्स, हॉटेलला काही प्रमाणात निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांनी यापूर्वी प्रशासनास सहकार्य केले आहे. यापुढेही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
फोटो ओळ : कल्याण-डोंबिवलीत कोराेनाचे रुग्ण वाढू लागल्याने शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजी मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली. (छाया : मुरलीधर भवार)
------------------
.