चाचणीबाबत आयुक्तांनाही ठेवले अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:33 AM2021-01-06T00:33:51+5:302021-01-06T00:33:54+5:30
तूर्तास ब्रेक : ठाणे महानगरपालिकेवर ओढवली नामुष्की : नियोजन फसले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनावरील लसीचे ड्राय रन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. तसे सूचना फलकही
लावले होते. मात्र, आयुक्तांसह महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे या चाचणीला तूर्तास ब्रेक लावण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली.
गेल्या आठ महिन्यांपासून ठाणे शहरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच कोरोनावर लस कधी येणार याची प्रतीक्षा रुग्णांसह नागरिकांमध्येही आहे. त्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही कोरोना लसींच्या मर्यादित वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी नुकतीच परवानगी दिली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ड्राय रन चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून शहरात पाच ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरीचे नियोजन केले होते.
आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर केले होते आयोजन
n कोपरीतील प्रसूतिगृह, कासारवडवली येथील रोझा गार्डन आरोग्य केंद्र, मुंब्रा प्रेक्षागृह आणि मुंब्य्रातील महापालिका शाळा क्रमांक ७८ या ठिकाणी या सराव फेरी होणार होत्या. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजू मुरुडकर यांनी या सराव फेरीचे परस्पर नियोजन केले होते, तसे फलकही संबंधित केंद्रांवर लावले होते, परंतु या चाचणी संदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना कोणतीच कल्पना दिलेली नव्हती.
n आयुक्तांच्या संमतीविनाच या चाचणीचे नियोजन केल्याचे समोर आले आहे. या फेरीसाठी शासनाकडूनही आदेश आलेले नाहीत. यामुळेच ही मोहीम बासनात गुंडाळावी लागली आहे. आयुक्तांची परवानगी मिळाली नसल्यामुळे मंगळवारपासून लसीकरण सराव फेरी सुरू होऊ शकलेली नसल्याचा दावा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू मुरुडकर यांनी केला. याबाबत आयुक्तांसोबत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.
पोखरण रोड येथील डॉ. आंबेडकर भवन, तसेच कोपरी येथील सेठ लखमीचंद फतीमचंद प्रसूतिगृह येथील संभाव्य लसीकरण केंद्रावर मंगळवारी जय्यत तयारी केल्याचे आढळले. दिवसाला ९० ते १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असल्याची माहिती या केंद्राचे समन्वयक राजेश कोळी यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात लसीकरण सराव फेरी घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी सराव फेरीची तारीख अद्याप निश्चित केली नाही.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका