लोकप्रतिनिधींच्या आरोपांना आयुक्त देणार उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:25 AM2019-06-21T00:25:22+5:302019-06-21T00:25:35+5:30
शहरात नालेसफाई होत नसल्याचा झालेला आरोप, फेरीवाल्यांच्या कारवाईआड सहायक आयुक्त हप्ते घेत असल्याची नगरसेवकांनी केलेली ओरड आणि एकूणच प्रशासनाच्या कारभारावर घेतलेला आक्षेप यावरून बुधवारची महासभा चांगलीच चर्चेत राहिली.
ठाणे : शहरात नालेसफाई होत नसल्याचा झालेला आरोप, फेरीवाल्यांच्या कारवाईआड सहायक आयुक्त हप्ते घेत असल्याची नगरसेवकांनी केलेली ओरड आणि एकूणच प्रशासनाच्या कारभारावर घेतलेला आक्षेप यावरून बुधवारची महासभा चांगलीच चर्चेत राहिली. परंतु, आता या सर्वांचा समाचार घेण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या महासभेत आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: हजर राहणार असल्याने या सर्वांची उत्तरे देण्याबरोबरच नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचाही समाचार घेणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. शुक्रवारच्या महासभेत अनेक महत्त्वाचे आणि चुकीचे विषय मंजुरीसाठी पटलावर आले असल्याने नगरसेवक आता आयुक्तांसमोर आक्रमक भूमिका घेणार की नांगी टाकणार, असा सवालही आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अनुपस्थितीत फेरीवाल्यांच्या मुद्यावरून सहायक आयुक्तांचा हप्तेखोर असा उल्लेख करणाºया लोकप्रतिनिधींना या महासभेत आयुक्त स्वत: उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एरव्ही सभागृहात प्रशासनाविरोधात बोलणारे लोकप्रतिनिधी आयुक्तांसमोर आक्र मक होण्याची हिम्मत दाखवणार का, हे स्पष्ट होईल.
बुधवारी झालेल्या महासभेत फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. नऊ प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त फेरीवाल्यांवर करवाई करत नसून ते सर्व हप्तेखोर असल्याचा उल्लेख भर महासभेत ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला होता. त्यानंतर, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात फेरीवाल्यांवर करवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
आजच्या महासभेला जयस्वाल राहणार उपस्थित
फेरीवाल्यांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप महासभेत सदस्यांनी केला होता. नगरसेवकांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती.
शुक्रवाराच्या महासभेत आयुक्त जयस्वाल स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता असून नगरसेवकांच्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे.