आयुक्तच होणार तिकीट तपासनीस
By admin | Published: July 11, 2015 03:27 AM2015-07-11T03:27:48+5:302015-07-11T03:27:48+5:30
ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली.
ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. प्रत्येक टीसीला टार्गेट दिले जात असतानाही ते कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. विशेष म्हणजे ते काम करीत नसल्याचे प्रशासनानेही मान्य केले आहे. त्यामुळेच आता त्यांना कामाला लावा, वेळ पडल्यास मीसुद्धा महिन्यातून एकदा प्रवाशांची तिकिटे तपासण्याचे काम करण्यास तयार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त अशोक रणखांब यांनी दिली. परंतु, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे तिकीट तपासण्याचे काम करून परिवहनचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असेही खडेबोल त्यांनी परिवहन व्यवस्थापकांना सुनावले.मुंब्रा, रेतीबंदरची परिवहन सेवा बंद का केली, बसथांब्यांचे काम का रखडले, असे सवाल शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी, तर आगारातून शुक्रवारी किती बस निघाल्या, असा सवाल नजीब मुल्ला यांनी केला. त्यावर माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिले. गुरुवारी किती बस आगारातून निघाल्या, याची माहिती मागितली असता १९९ बस रस्त्यावर धावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी १४३ बस रस्त्यावर धावल्याचा गौप्यस्फोट करून मुल्ला यांनी त्यांना तोंडघशी पाडले. परिवहनमधून किती बस बाहेर पडतात, याचीच माहिती व्यवस्थापकांना नसल्याचे या वेळी उघड झाले. एकाच बसची वारंवार दुरुस्ती करून पैशांचा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. केडीएमटी, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांच्या बस ठाण्यात उत्पन्न मिळवत आहेत. परंतु, ठाणे परिवहन सेवा ठाण्याबाहेर जाण्यास का तयार नाही, असा सवाल सुधीर भगत यांनी उपस्थित केला.
परिवहनमध्ये ३५ टीसी असून त्यांच्याकडून महिनाकाठी केवळ १२०० रुपयांचाच दंड वसूल होत असल्याचा मुद्दा रामभाऊ तायडे यांनी उपस्थित केला. यावर प्रत्येकाला महिन्याला १५ केसेसचे टार्गेट दिले असून ते वाढवून २० केले होते. परंतु, कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे सदस्य आक्रमक झाल्याने अखेर प्रभारी आयुक्तांनी त्यांना कामाला लावा, अन्यथा त्यातील कामचुकार टीसी कमी करा, असे आदेश त्यांनी दिले. याशिवाय, मुंब्रा रेतीबंदर बस उद्यापासून सुरू होईल. (प्रतिनिधी)