उल्हासनगरातील धोकादायक इमारतीबाबत आयुक्त घेणार आढावा बैठक
By सदानंद नाईक | Published: September 19, 2022 05:45 PM2022-09-19T17:45:55+5:302022-09-19T17:47:07+5:30
शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून मृत्यूचे तांडव सुरू
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून मृत्यूचे तांडव सुरू असून शासनाच्या पुनर्बांधणी राजपत्रकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आयुक्त अजीज शेख हे गुरूवारी धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगरात एका वर्षात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून १५ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला. तर हजारो नागरिक बेघर झाले. धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी एक समिती गठन करून एका महिन्यात नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी गुड न्यूज दिली. उल्हासनगरातील धोकादायक इमारतीचे पुनर्बांधणी व सन २०२१ पर्यंतची अवैध बांधकामे नियमित करण्याचा समितीचा अहवाल मिळाला असून लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर शहरात फटाक्यांची आतिषबाजी होऊन शिंदे गटाच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता. तसेच शहरभर पोस्टर्सबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर शासनाने धोकादायक इमारत पुनर्बांधणी व अवैध बांधकाने नियमित करण्या बाबतचे परिपत्रक काढले नसल्याने, नागरिकांत धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून बळीची संख्या वाढत आहे. तसेच बेघर नागरिकांची संख्या हजारोच्या संख्येत गेली. रविवारी सकाळी साडे आठ वाजता साई सदन इमारतीची गच्ची शेजारील घरावर पडून ६१ वर्षीय गोपाळदास गोबरा यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. आयुक्त अजीज शेख यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून अधिकारी, राजकीय नेते व नगररचनाकार यांच्याशी चर्चा केली. तसेच शहरातील धोकादायक इमारती बाबत गुरवारी आढावा बैठक बोलविल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
शहरासाठी लवकरच आनंदवार्ता- प्रांताधिकारी
शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी व सन २०२१ पर्यंतची अवैध बांधकामे नियमित करण्या बाबत नियुक्त केलेल्या समितीने मुख्यमंत्री यांना अहवाल दिला. तो अंतिम टप्प्यात आहे. शासन कधीही याबाबत परिपत्रक काढून शहरवासियांना आनंदाची बातमी देण्याची शक्यता प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी व्यक्त केली.