पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोडपट्यांचा होणार कायापालट, रंगरंगोटीसह मुलभुत कामे करण्याचे आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:44 PM2018-12-03T17:44:34+5:302018-12-03T17:47:05+5:30
इंदिरा नगर भागातील झोपडपट्यांना रंगरंगोटीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख दिल्यानंतर सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा पारसिक रेतीबंगर परिसरातील झोपडपट्यांकडे वळविला आहे. आता या भागातील झोपडपट्यांचाही याच पध्दतीने कायापालट केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे - पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सोमवारी सकाळी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्टयांची आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच या ठिकाणी मुलभूत कामे करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महत्वाचे म्हणजे या परिसरात स्मशानभूमीचा गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबरपासून या कामांना सुरूवात होणार आहे.
यावेळी मिसाल मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा रूबल नागी, स्थानिक नगरसेविका अनिता किणी, नगरसेवक राजेंद्र साप्ते, समाजसेविका ऋता आव्हाड आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या परिसराची पाहणी करून कोणत्या गोष्टी प्राधान्याने करावयाच्या आहेत याचा आढावा आयुक्तांनी घेतला. यामध्ये जुना गवळी पाडा येथे मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, शौचालयाचे कनेक्शन, विद्युत पोल बसविणे, कल्व्हर्ट बांधणे, नाल्याची भिंत बांधणे, मोबाईल हेल्थ सेंटर उपलब्ध करून देणे आदी सुविधा देण्याबाबत कार्यकारी अभियंत्यास आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे राणा नगर-जुना गवळी पाडा येथील दत्त मंदीरासमोर ओपन जिम तयार करणे, शाळेवर वर पत्रे बसविणे, या परिसरात पुरेसा पाणी पुरवठा करणे, विद्युत पोल बसविणे, कचरा कुंड्या बसविणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा गोळा करणे, नाल्याचे बांधकाम करणे, शिवाजी नगर भागात नाल्यांची साफसफाई, दुरूस्ती, शौचालयास पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणे, स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून शौचालयाची साफसफाई करणे त्याचप्रमाणे पंजाबी कॉलनी, आदर्श वसाहत, गौतम नगर, राम वाडी या परिसरात नालेसफाई, नाले खोल करणे व गटारे साफ करणे आदी कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच रेतीबंदर नुतन मैदान ४ नंबर या ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच येथील कल्व्हर्टची नियमित साफसफाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गेल्या ४० वर्षांपासून या ठिकाणी लोकांची वस्ती आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने या झोपडपट्टीला कधी भेट दिली नाही. परंतु संजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की त्यांनी या झोपडपट्टीला भेट देवून तेथील मुलभूत कामे करण्यास प्राधान्य दिल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.