आयुक्तांची पाठ फिरताच फेरीवाले रस्त्यांवर; कल्याण-डोंबिवलीतील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:36 PM2019-11-01T23:36:33+5:302019-11-01T23:36:47+5:30
केडीएमसीची कारवाई केवळ दिखावा असल्याची नागरिकांची टीका
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. मात्र, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे फेरीवाले बसलेले दिसले. त्यामुळे फेरीवाल्यांच्या विरोधातील महापालिकेची कारवाई म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या’ असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला.
कल्याण-डोंबिवलीतील स्टेशन परिसर व महत्त्वाचे रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी स्वतंत्र दोन वाहने कल्याण व डोंबिवलीतील पथकांना दिली आहेत. मात्र, कारवाई पथकाकडून दररोज कारवाई होत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांवर पथकाचा वचक नाही. डोंबिवलीत स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांमध्ये जागेवरून हाणामारी झाली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेमुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांना जमत नसेल तर त्यांनी बदली करून घ्या, असा सल्ला दिला. त्यामुळे बोडके यांनी गुरुवारी कल्याणमध्ये रस्त्यावर उतरून फेरीवल्यांविरोधात कारवाई केली. मात्र, त्यांची पाठ फिरताच काही भाजीविक्रेते लगेच रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. अनेकांचा माल जप्त केल्यावरही फेरीवाल्यांनी शुक्रवारी पुन्हा पथारी पसरल्याचे दिसून आले.
फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई केवळ फार्स असल्याची चर्चा होत आहे. आयुक्तांनी कारवाईत सातत्य ठेवले जाईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात शुक्रवारी स्टेशन परिसरात फेरीवाले बसले असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई केली गेली नाही. तोच प्रकार डोंबिवली स्टेशन परिसरात दिसून आला. लोकसभा निवडणुकीच्या काळात डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविले होते. मात्र निवडणूक संपताच डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले. निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यस्त असल्याने फेरीवाला कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याची कबुली स्वत: आयुक्तांनी दिली होती. आता आचारसंहिता संपल्याने कारवाईस वेग येणे अपेक्षत होते. मात्र, तसे झाले नाही. कारवाईचा जोश फक्त आयुक्तांच्या उपस्थितीतच दिसून आला.
‘... तर जाब विचारणार’
कल्याण न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या दुकानदारांच्या दुकानांचे पुढे आलेले पत्रे गुरुवारी तोडण्यात आले. ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत दुकानदारांनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी भोईर म्हणाले की, ‘महापालिकेची कारवाई चुकीची असल्यास महापालिकेस जाब विचारला जाईल.’