त्रास सहन करणाऱ्या भिवंडीकरांना आयुक्तांचा ‘सलाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:02 AM2019-07-01T00:02:49+5:302019-07-01T00:02:57+5:30
आयुक्त हिरे यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने शनिवारी महापालिकेमार्फत पालिकेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भिवंडी : भिवंडीकरांना सलाम, भिवंडीच्या पदाधिकाऱ्यांना सलाम, भिवंडीत दुरुस्त होणा-या रस्त्यांना सलाम, त्यांचे काम करणा-या कंत्राटदारांना सलाम, त्यापासून त्रास होत असताना, त्रास सहन करत असलेल्या सर्व भिवंडीकर नागरिकांना सलाम, भिवंडीतील अनधिकृत बांधकामांना सलाम, भिवंडीतील अनधिकृत बांधकाम करणा-यांना सलाम, या कामांस सहकार्य करणा-यांना सलाम... अशा शब्दांत महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शनिवारी प्रशासकीय सेवेचा निरोप घेतला. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘सलाम’ या कवितेवर आधारित स्वरचित कविता सादर करून व्यवस्थेपुढे हात टेकल्याची भावना हिरे यांनी व्यक्त केली.
आयुक्त हिरे यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने शनिवारी महापालिकेमार्फत पालिकेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिरे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महापौर जावेद दळवी यांनी गौरव केला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे खा. कपिल पाटील, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल, स्थायी समिती सभापती मदन नाईक, गटनेते विलास पाटील, निलेश चौधरी, संजय म्हात्रे व संतोष शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. हिरे यांना निवृत्तीपूर्वी भिवंडीतील नियुक्ती प्राप्त झाली. तेथील रस्ते कंत्राटदार, अनधिकृत बांधकाम करणारे माफिया अशा अनेक गोष्टींकडे कानाडोळा करणारे पदाधिकारी यांना हिरे यांनी निरोपाच्या भाषणात ‘सलाम’ कवितेतून चपराक लगावली.
हिरे म्हणाले की, आयुक्तपदाचा पदभार घेतला, तेव्हा अनेक प्रश्न प्रलंबित होते. ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम माझ्या कारकिर्दीत पूर्ण होऊ शकले नाही. यावेळी ऊर्मिला हिरे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. महापौर दळवी म्हणाले की, महापालिकेत आयुक्त म्हणून हिरे रुजू झाले तेव्हापासून त्यांनी विकासाची कामे करण्याचे निर्णय झटपट घेतले. हिरे यांच्या पूर्वीच्या काळातील अनेक रखडलेली कामे पूर्ण करण्यात आयुक्तांनी पुढाकार घेतला. रस्ते, एलईडी पथदिवे, स्वच्छता अभियान, पंतप्रधान आवास योजना आदी महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले.
प्रशासन - लोकप्रतिनिधींचा ताळमेळ हवा
- आयुक्त हिरे यांनी सर्व पदाधिकारी व शहरातील प्रमुख सामाजिक संघटनांना विश्वासात घेऊन काम केले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा चांगला ताळमेळ असेल, तर विकासाची कामे होतात.
हिरे यांनी खासदार या नात्याने अनेक प्रकरणांचा पाठपुरावा माझ्याकडे केला, असे खा. कपिल पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी केले.