शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
By धीरज परब | Published: May 29, 2023 07:51 PM2023-05-29T19:51:00+5:302023-05-29T19:51:11+5:30
येणारा पावसाळा आणि सुरु होणाऱ्या पालिका शाळा ह्या बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
मीरारोड - येणारा पावसाळा आणि सुरु होणाऱ्या पालिका शाळा ह्या बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आयुक्तांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, रवि पवार व कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी नालेसफाईची कामे पूर्ण करून घेण्यासह कचऱ्यामुळे अंतर्गत व मोठे नाले तुंबणार नाहीत याची काळजी घ्यावी. नालेसफाईच्या गाळ पूर्णपणे काढून घ्यावा. सखल भागात पावसाळ्यात पाणी साचू नये त्यासाठी पंप बसवून ते सुरू असल्याची खात्री करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले.
नाले व खाडी पात्रातील भराव आणि अतिक्रमण कोणाचाही मुलाहिजा न ठेवता काढा अन्यथा संबंधित अधिकाऱ्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. नाले व गटारावरील तुटलेली झाकणे नव्याने बसवून घ्या. रस्ते खोदाईची नव्याने परवानगी देऊ नये. रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्र प्रत्येक प्रभागात सुरू करून त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करा असे आयुक्तांनी बजावले.
साथीच्या रोगांच्या उपचारासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण करून त्वरित त्या फांद्या उचलून घेण्यास सांगितले. महापालिका शाळा १५ जून पासून सुरु होणार असल्याने त्यापूर्वी शाळांची साफसफाई, बेंच व फळे, वीज दिवे, खिडक्या - दारे आदींच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करा. त्याची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करा. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व इतर साहित्य हे वेळेत दिले गेले पाहिजे असे बजावत १० वीचे वर्ग सुरु केले जाणार असल्याने त्या कडे सुरवाती पासूनच लक्ष द्यावे. जेणे करून १० वीचा निकाल शंभर टक्के लागेल असे आयुक्तांनी सांगितले.