समस्या जाणण्यासाठी आयुक्तांचा फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:41 PM2019-09-21T22:41:59+5:302019-09-21T22:42:14+5:30

शहराला बकालपणा, कामे पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

Commissioner's tour to find out the problem | समस्या जाणण्यासाठी आयुक्तांचा फेरफटका

समस्या जाणण्यासाठी आयुक्तांचा फेरफटका

Next

भिवंडी : महापालिका क्षेत्रात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी शुक्र वारी दुपारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकासह शहर परिसरातून फेरफटका मारत शहरातील समस्यांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांचा ताफा तीनबत्ती, खडक रोड येथे पोहोचला असता त्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्वाती कांबळे यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह आयुक्तांच्या गाडीला थांबवून भरपावसात शहरातील बकालपणाची माहिती विशद केली. खडक रोड येथे भाजीमार्केटलगत घंटागाडीतील कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

नागरिकांसह या रोडवरून प्रवास करणाºया प्रवाशांना नाकातोंडावर रूमाल ठेवूनच प्रवास करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा थेट चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही मागणी आयुक्तांनी तत्काळ मान्य करून घंटागाडीतील कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नागरिकांची तूर्तास दुर्गंधीमधून सुटका झाली आहे. पालिका प्रशासनाने खडक रोड परिसरात वर्षभरापासून गटारांचे खोदकाम करून ठेवलेले आहे. मात्र, अद्यापि बांधकाम केलेले नाही. त्यामुळे या रोडला नाल्याचे स्वरूप मिळाल्याचे आयुक्तांच्या नजरेत आणून दिले. त्यावर पालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी नागरी कामांसाठी थोडा अवधी मागून घेऊन लवकरच सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

भिवंडी महापालिका प्रशासनाचे घातले श्राद्ध
महापालिका प्रशासन विविध नागरी समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. पालिका प्रशासन समस्यांकडे अक्षरश: दुर्लक्ष केल्याने शहरात नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भिवंडीकर संघर्ष समितीने अध्यक्ष सुहास बोंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी पितृपक्षातच पालिका प्रशासनाचे श्राद्ध घालून अनोखे निषेध आंदोलन केले. यावेळी सात कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध नोंदवला. अनेकदा मोर्चे, आंदोलने करूनही प्रशासन दाद देत नसल्याने समितीला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. या आंदोलनात शहरवासीयांनीही मोठी गर्दी केली होती. भिवंडी शहरात पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी विविध नागरी समस्या आहेत. याविरोधात समितीने वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, आजही या समस्या सोडवण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे या समस्या ‘जैसे थे’ आहेत. पालिका प्रशासन सुस्त असल्याने अखेर समस्यांनी ग्रस्त झालेल्या भिवंडीकरांनी शुक्र वारी नदीनाका येथील टिळक घाटावर महापालिका प्रशासनाचे श्राद्ध घालून निषेध नोंदवला. यावेळी संघर्ष समितीचे कार्यकर्ते केशर भुरा यांच्यासह सात कार्यकर्त्यांनी मुंडण करून पितृपक्षात पालिका प्रशासनाचे सामूहिक श्राद्ध घालून निषेध केला आहे.

Web Title: Commissioner's tour to find out the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.