आयुक्तांच्या दोन वर्षे मुदतवाढीचा ठराव झालाच नाही, लोकप्रतिनिधींनी केली केवळ चमकेशगीरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 08:01 PM2017-11-28T20:01:00+5:302017-11-28T20:01:00+5:30
आयुक्तांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरुन सध्या पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. परंतु, मुदतवाढीचा ठराव झाल्याचा नसल्याचा सुर आता येऊ लागला आहे.
ठाणे - रस्ता रुंदीकरणापाठोपाठ, शहरातील सर्वच नगरसेवकांना खुश करीत प्रशासनाने तब्बल ५१८ कोटींचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला महासभेतही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या महासभेत आयुक्तांच्या अभिनंदानाचा ठराव मंजुर झाला. यावेळी आयुक्तांना दोन वर्षे मुदत वाढ द्यावी म्हणून ठोबळ चर्चा झाली होती. परंतु आता तसा ठराव झाल्याचा गवगवा केला जात असून तसा अद्यापही कोणत्याही प्रकारचा ठराव झालाच नसल्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ आयुक्तांशी जवळीक साधण्यासाठी आणि त्यांच्यावर आपले कीती प्रेम आहे, हे दाखविण्यासाठीच हा दिखाव्याचा ठराव केल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या महासभेत, नऊ प्रभाग समितीमधील ७० रस्त्यांचा तब्बल ५१८ कोटींचे प्रस्ताव मंजुर झाले आहेत. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाचे तोंडभरुन कौतुक करतांना आयुक्तामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. त्यामुळे सभागृह नेत्यांसह विरोधी पक्षनेते आणि इतर काही आयुक्तांच्या जवळ असलेल्या लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या अभिनंदाचा ठराव केला. तसेच काहींनी तर आयुक्तांना दोन वर्षे मुदतवाढ द्यावी असेही म्हंटले. तसा ठरावही यावेळी करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता तशा आशयाचा ठराव मंजुर झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ अभिनंदाचा ठराव झाला असून मुदत वाढीच्या ठरावावर केवळ चर्चाच झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. आयुक्त राहावेत ही आमचही इच्छा आहे. परंतु अद्याप तसा ठराव झाला नसल्याचे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले. त्यातही नियमानुसार असा ठराव करता येत नसल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यामुळे केवळ आयुक्तांशी पंगा नको, आणि आपल्या प्रभागातील कामे करुन घेण्यासाठीच आयुक्तांच्या जवळ असलेल्या काही लोकप्रतिनिधींनी हा अट्टाहास झाला असावा अशी चर्चा मात्र आता पालिका वतुर्ळात सुरु झाली आहे. त्यातही अभिनंदाचा ठराव करावा असे काही लोकप्रतिनिधींना सांगण्यात आले होते, त्यानुसारच हा अभिनंदाचा ठराव देखील करण्यात आल्याचे काही लोकप्रतिनिधींनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा गौप्यस्फोट केला आहे.
- आरक्षकांच्या भरती बाबत स्थानिकांना ५० टक्के आरक्षण असावे असा ठराव देखील नुकत्याच महासभेत लोकप्रतिनिधींनी केला होता. परंतु तसा ठराव करता येत नसल्याचे प्रशासनानेच सांगितले होते. मग आयुक्तांच्या मुदतवाढीचा ठराव ग्राह्य धरला जाईल का?, शिवाय यापूर्वी देखील असे अनेक ठराव लोकप्रतिनिधींनी करुन ते शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. परंतु ते अद्यापही शासनाच्या लालफीतीत अडकले आहेत.
अभिनंदनाचा ठराव महासभेत झाला होता. परंतु मुदतवाढीचा ठराव झालाच नसून त्यावर केवळ चर्चा झाली आहे. नियमानुसार तसा ठराव करताच येत नाही.
(मिलिंद पाटील -विरोधी पक्षनेते, ठामपा)
अभिनंदनाचा ठराव झाला असून मुदतवाढीचा ठराव करण्याबाबत आता चर्चा सुरु आहे. त्यानुसार ठराव केला जाईल.
(नरेश म्हस्के - सभागृह नेते, ठामपा)