धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:38 AM2018-12-29T06:38:11+5:302018-12-29T06:39:15+5:30
रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
- नारायण जाधव
ठाणे : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याबाबत, गेल्या २० वर्षांपासून अनेकदा आंदोलने झाली. यावर उपाय म्हणून अखेर मच्छीमारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा समितीचा उतारा शोधला आहे. यानुसार, कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन अधिकारी डॉ. विवेक वर्तक यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश असलेली नऊसदस्यीय समिती गुरुवारी स्थापन केली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही विभागाने दोनदा समित्यांचे गठण करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. मात्र, तरीही खाडीतील प्रदूषण आणि कमी होणारे मत्स्योत्पादन आणि त्यामुळे उद्भवणाºया मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यास मत्स्यव्यवसाय विभागास अपयश आले आहे.
महाराष्ट्र शासनाने बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै २०१४ रोजी डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छीमार शिक्षा संस्थान वर्सोवा-अंधेरी (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.
त्यानंतर, निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि पीएनपीकडून होणाºया प्रदूषणासाठी पुन्हा एकदा २४ फेबु्रवारी २०१६ रोजी आणखी एक समिती नेमण्यात आली. आता पुन्हा डॉ. विवेक वर्तक यांच्या अध्यक्षतेखील समिती नेमली आहे.
साडेतीन हजार मच्छीमारांवर गदा
निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेटी व बार्जेसद्वारे मालवाहतूक करते. यामुळे धरमतर खाडीच्या १३५ मीटर रु ंदीच्या मध्यवर्ती पट्ट्यात जलवाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. ही परवानगीच आता पेण व अलिबाग तालुक्यांतील ४८ गावांतील सुमारे साडेतीन हजार स्थानिक मच्छीमारांच्या जीवावर उठली आहे.
मिठागरे, भातशेती संकटात
मालवाहू बार्जेस व स्पीड बोटींची दिवसरात्र चालणारी रेलचेल, कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण वाढून मत्स्योत्पादनाबरोबरच लाटांच्या प्रहारामुळे फुटणारी समुद्रतटीय खारभूमी, संरक्षक बंधारे, नापीक भातशेती अशा असंख्य समस्या सदर भागात उद्भवल्या आहेत.
समितीची कार्यकक्षा
या समितीस खाडीत जलप्रदूषण वाढले आहे काय, मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे काय, बाधित कुटुंबांची संख्या व झालेले नुकसान, धरमतर खाडीसह आसपासच्या किनाºयांच्या प्रदूषणात औद्योगिक सांडपाण्यामुळे वाढ झाली आहे काय, बाधित माशांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठीच्या उपायांचा अहवाल दोन टप्प्यांत सादर करावयाचे आहेत.