ठाण्यातील सुविधा भुखंड, जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुल उभारण्याचे आयुक्तांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:05 PM2017-12-26T16:05:26+5:302017-12-26T16:09:54+5:30
ठाणे महापालिका आयुक्तांनी आता शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने प्रदुषण टाळण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने घेण्यावर अधिक भर द्यावा अशा सुचनाही दिल्या.
ठाणे - शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून सुसज्ज वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून याबाबतची निविदा प्रक्रि या येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान यापुढे नवीन दुचाकी आणि तीनचाकी वाहने खरेदी करताना ती इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी कार्यशाळा विभागाला दिले.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी घेतलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा करून म्हाडा सर्वे नं. २१४, नळपाडा येथील सुविधा भुखंड, वसंत विहार ले आऊट, जुनी महापालिका भवन येथील पालिका बझार आणि महात्मा फुले मार्केट या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून सुसज्ज वाणिज्य संकुले उभी करण्याबाबत प्रस्ताव तयार करून १५ जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रि या पूर्ण करण्याचे आदेश दिले.
दरम्यान यापुढे कार्यशाळा विभागाच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजासाठी दुचाकी किंवा तीन चाकी वाहने खरेदी केली जातात ती वाहने आता इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेबाबत स्थानिक महिला मंडळे, महिला बचत गट किंवा स्थानिक स्वंयसेवी संस्थांकडून तात्काळ अर्ज मागवून त्यांना कामे देण्यात यावीत अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या.