मनोरुग्ण महिलेचा लोकलमध्ये गोंधळ, प्रवासी जखमी; हेल्पलाइन ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:49 PM2022-02-10T12:49:56+5:302022-02-10T12:50:38+5:30
मेस्त्री यांनी बुधवारी सकाळी सफाळे येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बोईसर स्थानकातून १० वाजून २८ मिनिटांची डहाणू-विरार लोकल पकडली. महिलांच्या डब्यामध्ये एका मनोरुग्ण महिलेने उमरोळी स्थानकापासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पालघर : डहाणू ते विरारदरम्यान प्रवास करताना महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, डहाणूवरून विरारकडे जाणाऱ्या १० वाजून ५ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात एका मनोरुग्ण महिलेमुळे झालेल्या गोंधळात ३६ वर्षीय महिला पत्रकार विभूती मेस्त्री जखमी झाल्या आहेत. पालघर पोलिसांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सोडले.
मेस्त्री यांनी बुधवारी सकाळी सफाळे येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बोईसर स्थानकातून १० वाजून २८ मिनिटांची डहाणू-विरार लोकल पकडली. महिलांच्या डब्यामध्ये एका मनोरुग्ण महिलेने उमरोळी स्थानकापासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ती महिला प्रवाशांच्या अंगावर धावून जाऊ लागली. यावेळी काही महिलांना तिने मारहाण करीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे विभूती यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या गोंधळामुळे डब्यातील महिलांमध्ये घबराटीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विभूतीसह अनेक महिलांनी प्रसंगावधान राखून रेल्वे पोलिसांच्या १५१२ व १३९ या दोन्ही हेल्पलाइनवर तत्काळ मदतीसाठी अनेक वेळा संपर्क साधूनही संपर्क झाला नाही. यामुळे पश्चिम रेल्वेची ही सेवा फक्त नावापुरती उपलब्ध करण्यात आल्याचे दिसून आले. विरार ते डहाणूदरम्यान स्थानकात सीसीटीव्ही लावण्याची मागणी होत केली जात आहे.
तक्रार दाखल नाही
- लोकलने पालघर स्थानकात प्रवेश केल्यावर विभूती हिने दरवाजात येऊन रेल्वे पोलिसांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला.
- या प्रयत्नांत लोकलच्या डब्यातील गोंधळामुळे त्या धावत्या लोकलमधून फलाटावर पडून जखमी झाल्या.
- जखमी महिलेला रेल्वे महिला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. यासंदर्भात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे सपोनि पी.डी. देवकाते यांनी सांगून त्या मनोरुग्ण महिलेला स्टेशनच्या बाहेर सोडल्याचे सांगितले.