उल्हासनगरातील धोकादायक इमारतीमधील नागरिकांसोबत साधणार संवाद!
By सदानंद नाईक | Published: May 10, 2023 04:42 PM2023-05-10T16:42:57+5:302023-05-10T16:43:16+5:30
उल्हासनगरात जुन्या इमारतींचे स्लॅब कोसळून यापूर्वी अनेकांचे बळी गेले. पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी, महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली.
उल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांसाठी ११ मे रोजी टॉउन हॉलमध्ये संवाद साधणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. मार्गदर्शन शिबिराला नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही लेंगरेकर यांनी केले आहे.
उल्हासनगरात जुन्या इमारतींचे स्लॅब कोसळून यापूर्वी अनेकांचे बळी गेले. पावसाळ्या अश्या घटना टाळण्यासाठी, महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली. तसेच १० वर्ष कालावधी पेक्षा जास्त जुन्या असलेल्या सुमारे १३०० इमारतीमधील रहिवाश्यांना इमारतीचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणेसाठी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. या नोटीसीने इमारतीचे जीव टांगणीला लागले असून ११ मेच्या आयोजित शिबिरात महापालिका काय निर्णय घेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील जुन्या इमारती मध्ये राहणारे हजारो नागरिक जागरुक नसल्याने व त्यांना इमारतीची दुरुस्ती, संरचनात्मक परिक्षण याबाबत विस्तृत माहिती नसल्याचे निदर्शनास आल्याचे आयुक्त अजीज शेख यांच्या लक्षात आले. यातुनच शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांमध्ये इमारतीची देखभाल, दुरुस्ती याबाबत जनजागृती व्हावी व इमारतीची दुरुस्ती नेमकी कशाप्रकारे करावी.
याची माहिती व्हावी यासाठी महापालिकेमार्फत गुरूवार दुपारी ४.०० वाजता जनरल अरुणकुमार वैद्य सभागृह (टॉऊन हॉल) मध्ये मार्गदर्शन शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. मार्गदर्शन शिबीरात नागरिकांना धोकादायक इमारतीच्या दुरुस्तीबाबतची कार्यपद्धती व इतर अनुषंगिक मुद्दयांवर तज्ञ व्यक्तीमार्फत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे