भाजपा सरकारवर कम्युनिस्टांचा हल्लाबोल, मुख्यमंत्री क्लीन चीट देतात- प्रकाश रेड्डी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 07:10 PM2018-04-22T19:10:06+5:302018-04-22T19:10:06+5:30
डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला.
डोंबिवली - डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला.
कॉ. शहीद भगतसिंग मित्र मंडळांच्या वतीने लोढा हेवन येथे रशियन क्रांतीकारक लेनिन, छत्रपतीशिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यातील जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महेश आवारे यांनी केले होते. यावेळी भाकप सचिव अरूण वेळासकर, मुंबई पक्षाचे नेते सुबोध मोरे, अक्षय पाठक, काळु कोमास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
रेड्डी यांनी देशातील व राज्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक व राजकीय परिस्थिती बाबत भाजपा सरकारला धारेवर धरत विविध युगपुरूषांची आठवण करून दिली. यावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निमिर्ती केली. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिवाजी महाराजांनी शेतक:यांना अभय दिला होता. परस्त्रीचा सन्मान केला होता. परंतु आज देशात स्त्रियाबाबत काय चालले आहे. आपल्या देशात ज्या घटना घडत आहेत त्यामुळे मान शरमेने खाली जाते. ज्योतिबा फुले यांनी भांडवलीशाही व भटशाही विरोधात आंदोलन केले. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणो शहरातील जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले असते. तर कुणी लोढा येथे दिसले नसते. घरे स्वस्त मिळाली असती. या देशात कार्पीरेट अंबानी यांचे राज्य जाऊन कामगार, शेतकरी, कष्टकरी, आदीवासी महिला यांचे राज्य यावे. समाजवाद यावे. रशियातील लेनिन क्रांतीचा परिणाम बाबासाहेब आंबडेकर , रविंद्रनाथ टागोरां वर झाला. या सर्व युगपुरूषांचे विचार घेऊन सरकारांच्या विरोधात लढले पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ही ते म्हणाले.