कम्युनिस्टांचा भव्य मोर्चा

By admin | Published: October 17, 2015 01:41 AM2015-10-17T01:41:08+5:302015-10-17T01:41:08+5:30

वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, खावटी कर्जवाटप, पीककर्ज, रेशन काळाबाजार इ. महत्त्वपूर्ण अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत मोर्चा काढूनही समाधानकारक कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ

Communist Frontier Front | कम्युनिस्टांचा भव्य मोर्चा

कम्युनिस्टांचा भव्य मोर्चा

Next

पालघर : वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, खावटी कर्जवाटप, पीककर्ज, रेशन काळाबाजार इ. महत्त्वपूर्ण अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत मोर्चा काढूनही समाधानकारक कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष व इतर संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणून निर्माण करण्यात आला असून दारिद्र्य, उपासमारी, कुपोषण, विस्थापन, निरक्षरता, रोगराई आदी समस्यांनी ग्रासलेला आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित प्रश्नांवर तातडीने अनेक पावले उचलण्याची गरज असून पालघर जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज, वीजबिल आणि विद्यार्थ्यांना फी माफी करावी. रेशनवर अपुरा धान्यपुरवठा होत असताना दोन वर्षांपासून बंद असलेली खावटीवाटप प्रक्रिया दारिद्र्यरेषेचा निकष न लावता सुरू करावी. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी विकत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द करावा. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून सर्व जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात. पालघर-ठाणे-नाशिकमधील आदिवासी गावे बुडवून गुजरातकडे पाणी वळविणारी जनविरोधी नदीजोड योजना रद्द करावी. वाढवण बंदर रद्द करावे. रोहयोंतर्गत कपात रद्द करून शेतमजुरांना वर्षभर काम व ३०० रु. मजुरी द्यावी. दापचरी प्रकल्पात एमआयडीसी सुरू करून बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार द्यावा. रेशनव्यवस्थेतील काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. असंघटित कामगारांना किमान १५ हजार वेतन द्यावे. अंगणवाडी सेविकांचे मागील सहा महिन्यांचे थकीत मानधन, भाऊबीजभत्ता त्वरित देऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांतील रिक्त पदे त्वरित भरावीत. महिलांवरील वाढते अत्याचार रोखले जाऊन अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, इ. प्रश्नांचे निवेदन मरियम ढवळे, डॉ. अशोक ढवळे, आर.जे.पी. गावित, बारक्या मांगात, सुनील धानवा इ.नी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांना दिले.
या वेळी सर्कल, तलाठी हे आदिवासींकडून पैशांची मागणी, डहाणूमध्ये रेशनधारकांचा सुरू असलेला काळाबाजार, विक्रमगड, कासा पोलिसांकडून गरिबांवर होत असलेला अन्याय, डहाणू येथील नरेश पटेल यांच्या कोळंबी प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या समस्या इ. प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आल्यानंतर या सर्व कामांची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. या वेळी ४ ते ५ हजार मोर्चेकरी उपस्थित होते. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

Web Title: Communist Frontier Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.