सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करा; प्रवासी संघटनांचं दिवा स्थानकात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 05:22 PM2020-11-11T17:22:53+5:302020-11-11T17:23:21+5:30

लोकल सेवा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

commuters organizations agitates in diva station demands to start local services for all | सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करा; प्रवासी संघटनांचं दिवा स्थानकात आंदोलन

सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करा; प्रवासी संघटनांचं दिवा स्थानकात आंदोलन

Next

डोंबिवली: सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात निदर्शनं करण्यात आली. आज देशातील सर्वच क्षेत्रात अनलॉकची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत आहे.अशा परिस्थितीत एमएमआर क्षेत्राची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा महिलांप्रमाणेच पुरुष प्रवाशांना ही अंशता सुरु करणे गरजेचे व शक्य होते. मात्र राज्य शासनाची निर्णय क्षमता व इच्छाशक्ती कमी पडत असल्याने सामान्य कष्टकरी वर्ग यापासून वंचित झाला आहे. यामुळे आज अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी सांगितले.

यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, महिला प्रतिनिधी लता अरगडे, सौ सुमती गायकवाड, सौ पांजणकार, प्रसाद भोईर, आनंदा पाटील, रोशन भगत, जितू गुप्ता, चंद्रकांत मोरे, संतोष गुप्ता, अँड किरण भोईर,  आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाला केलेल्या मागण्यादेखील उपस्थितांना वाचून दाखवण्यात आल्या. त्यात  सामान्य पुरुष प्रवाशांना लोकल सेवा अंशता किंवा पूर्णता परंतु तात्काळ खुली करावी, अशी मुख्य मागणी करण्यात आली. जर हे शक्य नसेल तर दूध विक्रेते भाजी विक्रेते मासे विक्रेते यांना लोकल प्रवास मुभा असावी, अधिस्वीकृतीधारक व्यतिरिक्त सर्व माध्यमांच्या सर्व पत्रकारांना लोकल प्रवासास मुभा द्यावी. यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगण्यात आले.

संपूर्ण लोकल सेवा खुली करण्यापूर्वी एमएमआरमधील कार्यालयीन वेळा महाराष्ट्र शासनाने बदलाव्यात व लोकलमधील पिकअवर्सची गर्दी कमी करण्यास लोकल प्रवाशांचेअपघात टाळण्यास तसेच  या उपायाद्वारे रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यास राज्य शासनाने प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणीवर राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही करावी यासाठी ही इशारा निदर्शने आहेत असे ऍड. आदेश भगत म्हणाले. राज्य शासनाने याबाबत  योग्य कार्यवाही न केल्यास येत्या काळात अधिक तीव्रपणे मंत्रालयासमोरच आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.

यासोबतच म.रे.ने बदलापूर टिटवाळा लोकल 15 डबा चालविण्याचा प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करावा, ठाणे दिवा 5व्या 6व्या लाईनची डेडलाईन पाळावी व 2021 मधे या मार्गावरुन लोकल सेवा सुरू करावी. दिवा स्थानकाची प्रवासी संख्या वेगाने वाढत असुन दिवा रिटर्न लोकलचे नियोजन करावे. सध्या भायखळा येथे असणारे ठाणे जिआरपी चे क्राईम ब्रँचचे कार्यालय ठाणे येथे स्थलांतरित करावे. वांगणी रेल्वे स्थानकाला  टर्मिनल स्थानक दर्जा देऊन वांगणी मुम्बई लोकल सुरु कराव्यात.सध्या 5 लोकल वांगणी ते बदलापूर 12 किमी रिकाम्या चालवीण्याचा मूर्खपणा रेल्वे करीत आहे.  कुर्ला ते सीएसएमटी 5वी व6वी लाईन कधी करणार ते रेल्वेने जाहीर करावे. दिवा-पनवेल मार्गावर पलावा निळ्जे परिसरात नवीन टर्मिनल स्थानक उभारावे. टिटवाळा व बदलापूर नियमित महिला लोकल सुरू करावी. अधिकृत स्ट्रेचर हमाल व रुग्णवाहिका प्रत्येक  स्थानकावर उपलब्ध करावी. एमयूटीपीचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. कल्याण कर्जत कसारा अशी शटल लोकल सेवा सुरु करावी. इत्यादी अनेक मागण्या रेल्वेकडे प्रलंबित असून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास रेल्वे प्रशासना विरुद्धही आंदोलन करू हेही जाहीर करत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: commuters organizations agitates in diva station demands to start local services for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.