कंपन्यांमुळे चिखलोली धरण प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:54 PM2019-12-15T23:54:47+5:302019-12-15T23:55:02+5:30
पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी : आतापर्यंत केवळ नोटिसा बजावल्या, कंपन्यांवर तातडीने कारवाईची गरज
अंबरनाथ : पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या चिखलोली धरणाचे पाणी शहरातील पूर्वेकडील विभागात वितरित करण्यात येते. हे पाणी पिवळसर रंगाचे येत असून पिण्यालायक नसल्याचे आढळले आहे. येथील रासायनिक कंपन्या या धरणात प्रदूषण करत आहेत. चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश तत्कालीन मंत्र्यांनीदेखील दिले होते. मात्र, या कंपन्यांना नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीच कारवाई झालेली नाही. परिणामी, पुन्हा चिखलोली धरणातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या धरणातील पाणीपुरवठा बंद करून एमआयडीसीकडून पुरवठा करण्याची मागणी होत आहे. केवळ काही कंपन्यांमुळे चिखलोली धरण प्रदूषित होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाºया चिखलोली धरणातून नियमित सहा दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, गेल्यावर्षी या धरणातील पाणी प्रदूषित आढळल्याने येथून नागरिकांना पाणीपुरवठा करणे बंद करण्यात आले होते. धरणात अवघे २० टक्के पाणी असताना ही बाब लक्षात आली होती. त्यावेळेस तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी २१ मे २०१८ रोजी पाहणी करून प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. तसे आदेशदेखील अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात हे धरण नसल्याने गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी ही लघुपाटबंधारे विभागाकडे गेली. त्यांनीदेखील धरणाची पाहणी करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसोबत दौरा केला. त्यानंतर धरणाच्या प्रदूषणाला जबाबदार काही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीसनंतर कंपन्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. तसेच संबंधित कंपन्यांवर गुन्हेही दाखल होणे गरजेचे होते. मात्र, दीड वर्ष उलटून गेल्यावरही या कंपन्यांवर आजपर्यंत कारवाई झालेली नाही.
एकीकडे कंपन्यांवर कारवाई थंडावलेली असताना दुसरीकडे धरणातील प्रदूषणाचे प्रमाण हे वाढतच गेले आहे. जे पाणी मार्च-एप्रिलमध्ये प्रदूषित होत होते, तेच पाणी आता आॅक्टोबरमध्येच प्रदूषित झाले आहे. त्यामुळे अंबरनाथ पूर्व भागाला दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येत आहे. भविष्यात चिखलोली धरणाचे अस्तित्व वाचविण्यासाठी धरणाला लागून असलेल्या कंपन्यांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. एमआयडीसीने धरणपात्रातही अनेक कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे धरणाला थेट धोका निर्माण झाला आहे. त्यातच या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव असल्याने भविष्यात पाण्याची पातळी वाढून ती रासायनिक कंपन्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी मुख्यमंत्री, मनसे नेते आ. राजू पाटील, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना संबंधित कंपन्यांवर कारवाईसंदर्भात निवेदन दिले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याने चिखलोली धरणाची गुणवत्ता धोक्यात आल्याचा आरोपही संदीप लकडे यांनी निवेदनात केला आहे.
नागरिकांच्या जीविताला धोका
च्तीन वर्षांपूर्वी चिखलोली धरण परिसरात रासायनिक गोण्या आढळून आल्या होत्या. मात्र, आजपर्यंत कोणत्याही कारखान्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. आजही परिस्थिती जैसे थे आहे.
च्चिखलोली धरणातून गढूळ, दूषित पाणीपुरवठा करण्यात आल्याने पूर्वेकडील हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून चिखलोली धरणाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
च्चिखलोली धरणातील पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंदर्भात एमआयडीसीशी चर्चा सुरू आहे. धरणातील प्रदूषित पाण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांनी सांगितले.