बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:39 AM2019-01-24T01:39:15+5:302019-01-24T01:39:25+5:30
बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या प्रकाश पटेल याला कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
ठाणे : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या प्रकाश पटेल याला कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पटेल आणि त्याचा साथीदार किरण प्रकाशे यांनी आपसात संगनमत करून सनी सुरेश लाड (३०, रा. महात्मा फुलेनगर, डोंबिवली) यांची २१ हजार ११४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी लाड यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लाड यांनी ४ जानेवारी रोजी डोंबिवलीच्या एका दुकानातून बजाज फायनान्स कंपनीच्या कर्जाद्वारे एक मोबाइल घेतला होता. यासाठी त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांची झेरॉक्स तसेच एक कॅन्सल केलेल्या धनादेशांसह कागदपत्रे दिली होती. तेव्हा, त्यांना बजाज फायनान्सकडून २१ हजार ११४ चे कर्ज मंजूर झाले. त्यानंतर, घोडबंदर रोडवरील दोन दुकानांमध्ये पुन्हा असाच प्रकार घडला.
>संशयातून प्रकार उघडकीस
सातत्याने अशा घटना घडल्याने कर्मचारी आणि फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकाश पटेल याला पकडले. त्याच्याकडील सनी सुरेश लाड हे नाव असलेले बनावट पॅनकार्ड तसेच आधारकार्ड जप्त करण्यात आले.