गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे निर्बंध आंबा व्यावसायिकांना सुखकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:22+5:302021-05-17T04:38:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आंबा उत्पादक, विक्रेता यांच्यावर सगळ्यात पहिले ...

Compared to last year, this year's restrictions are pleasing to mango traders | गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे निर्बंध आंबा व्यावसायिकांना सुखकारक

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे निर्बंध आंबा व्यावसायिकांना सुखकारक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आंबा उत्पादक, विक्रेता यांच्यावर सगळ्यात पहिले संकट ओढावले. त्याची धास्ती उराशी बाळगून यंदा काय होणार याची चिंता व्यावसायिकांसमोर होती, परंतु नाशवंत फळ असल्याने त्याच्या वाहतुकीला राज्य, केंद्र सरकारने परवानगी दिल्याने यंदा तुलनेने खूप समाधान मिळाल्याची भावना आंबा विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सर्वसाधारणपणे मुंबईत कोकणातून आंबा येतो. अलीकडे कर्नाटकहूनही आंबा यायला लागला आहे. परंतु असे असले तरी देवगड, रत्नागिरी येथील आंब्याला बाजारात चांगली मागणी असते आणि तोच आंबा डोंबिवलीकर चोखंदळ आणि खवय्यांनी यंदा चाखला. कोकणातील आंब्याकरिता डोंबिवली ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथील बहुतांश पांढरपेशा तसेच कोकणी खवय्यांनी देवगडच्या हापूसची मागणी केल्याने तेथून भरपूर आंबा यंदा येथे आला. आता देवगड पाठोपाठ रत्नागिरीमधूनही चांगले फळ बाजारात आले आहे.

पूर्वीसारख्या ५, ७ डझनाच्या पेट्यांना आता मागणी नसल्याने आता २ डझनाच्या पेट्या बाजारात उपलब्ध झाल्या असल्याने त्याला खूप चांगली मागणी आहे. येथील गुजराथी, जैन समाजामध्येही चांगल्या आंब्याला खूप मागणी वाढत असून विविध देवालयांमध्ये ती बंद असली तरी आंबे प्रसाद स्वरूपात दाखवण्यात येतात.

यंदाही फेरीवाले, घाऊक विक्रेते गल्लोगल्ली दिसत नसून घरातून किंवा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टोअरेज करण्यासाठी काही पेट्या मागवण्यात येत आहेत. आता एकदा ऑर्डर दिली की दोन दिवसात डिलिव्हरी होत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबे विक्रेते नागरिकांना व्यवसायाची माहिती देत आहेत. त्यामुळे आंबा कसा वाटला याचीही ताजी प्रतिक्रिया व्यावसायिकांच्या नावाने येत असल्याने विशेष जाहिरातबाजीचे प्रयोजनही करावे लागत नाही. आंबा किती मोठा यापेक्षा वजनाने कसा आहे याबाबतची माहिती ग्राहक विचारत असून त्यानुसार फळाची किंमत ठरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मध्यम, मोठे फळ असल्यास डझनाला किंमत बदलते.

---------

वाहतुकीची समस्या यंदा आली नाही. ऑर्डर दिली की दोन दिवसात आंबे मिळत आहेत. आंबे विकण्याचा व्यवसाय म्हणण्यापेक्षा ग्राहकांना आंबा मिळाला की तो खाऊन जे समाधान मिळते त्याचा आनंद खूप असतो. कोणत्याही अडचणी यंदा आलेल्या नाहीत. उलट मागणी वाढली असून चांगला आंबा दिल्यास नागरिक पुन्हा मागणी करत असल्याचा अनुभव आहे.

- जसराज सुधीर बर्डे , आंबा विक्रेता

-------

यंदा चांगली मागणी आहे. गेल्यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. यंदा केंद्र, राज्य सरकारने आंबा हे नाशवंत फळ असल्याने त्याच्या वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे वाहतूक करणे सोपे झाले. बरेच ग्राहक ठरलेले असल्याने मागणी आहेच, यंदाचा मोसम चांगला गेला, पण व्यावसायिक म्हणून बाजारपेठेत जशी मागणी असायला हवी तशी मिळाली नाही . ओळखीतून व्यवसाय तग धरून आहे.

- प्रसाद मोरे, आंबा विक्रेता

-----------------

गेल्या वर्षीपासून या व्यवसायात उतरलो आहे. प्रतिसाद खूप असला तरीही आंब्याचे नुकसान खूप होते. मालवाहतूकदार पेट्या कशाही भरतात. त्यात जिथे चेकिंग असते तिथे काहींच्या अपेक्षा असल्याचे सांगण्यात येते. ग्राहकही एखादं दुसरा आंबा खराब निघाला तर बदलून देण्याची अपेक्षा करतात, परंतु बाजारात सफरचंद, चिकू खराब झाला तर बदलायला जातात का? आणि समोरचा विक्रेता बदलून देतो का? याचा विचारही व्हावा असे वाटते

- चिंतामणी शिधोरे, आंबा व्यावसायिक

----------------

येथील राजकीय नेत्याने मुंबई परिसरात आंबा पाठवला असून खूप वेगाने व्यवसाय करण्यात आला. अडचणी फारशा आल्या नसून व्यवसाय करायला खूप चांगली संधी आहे. कोरोनाचे निर्बंध असतानाही व्यवसायाला गती मिळाली.

- चिन्मय मडके, आंबा विक्रेते

--------------

फणसाचे गरे यांनी खाल्ला भाव

आंबा पोळी, तळलेले फणसाचे गरे, कोकम सरबत, कोकम यांना खूप मागणी आहे. फणसाचे तळलेले गरे यंदा चढ्या भावाने विकले गेले आहेत. नागरिकांमध्ये त्याची खूप मागणी आहे.

-------------

Web Title: Compared to last year, this year's restrictions are pleasing to mango traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.