अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:13+5:302021-07-31T04:40:13+5:30
कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यांना सरकारने नुकसान ...
कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पाटील यांनी शुक्रवारी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. आडीवली ढोकळी परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे गुडघाभर पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू बुडाल्या. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खराब झाल्या. आधीच कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला असतानाच नागरिकांना जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. ज्या घरात पाणी शिरले होते, त्या घरांमध्ये रुग्ण होते. अनेकांनी कर्ज काढून घर घेतले आहे. हातात पैसा नाही, त्यामुळे घराचे कर्ज कसे फेडायचे, या सगळ्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना आर्थिक भरपाई दिली गेली पाहिजे. कल्याण ग्रामीण भागातील भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही भरपाई दिली गेली पाहिजे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. पाटील यांची मागणी सरकार दरबारी कळविली जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी त्यांना दिले आहे.
-------