ठाण्यातील जिम्नॅस्टिकपटूंमध्ये आंतरराष्ट्रीय पदकांची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:00 AM2019-12-24T02:00:20+5:302019-12-24T02:00:33+5:30
सर्गेई ब्लॉकोविच यांचा विश्वास : ठाण्यातील खेळाडूंना प्रशिक्षण
ठाणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा नसतानाही ठाण्यातील जिम्नॅस्टिकपटू अंगभूत कौशल्यामुळे आपली छाप राष्ट्रीय पातळीवर पाडत आहेत. या खेळाडूंना प्राथमिक पातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळाल्यास ते भारतासाठी निश्चितपणे आॅलिम्पिकपदक जिंकू शकतात, असा विश्वास येथील सरस्वती क्र ीडासंकुल आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील मूळचे रशियाचे तसेच कॅनडात स्थायिक असणारे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकविजेते सर्गेई ब्लॉकोविच यांनी ठाण्यात शुक्रवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आॅलिम्पिकपदकाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून आपल्या देशातही विविध खेळांसाठी परदेशी प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पण, या नेमणुका राष्ट्रीय संघासाठी किंवा ज्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे, त्या खेळाडूंकरिता होत आहेत. त्यामुळे प्राथमिक पातळीवरच आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळवून देण्याच्या हेतूने सरस्वती क्र ीडासंकुल, जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि खेळाडूंच्या पालकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जिम्नॅस्टिक सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन सर्गेई ब्लॉकोविच यांची नियुक्ती केली होती. गेले तीन महिने ते सरस्वती क्र ीडासंकुलातील जिम्नॅस्टिकपटूंना मार्गदर्शन करत आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे पायाभूत प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल, असा विश्वास जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक महेंद्र बाभुळकर यांनी त्यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी पत्रकार परिषदेत सरस्वती क्र ीडासंकुलाचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, जिल्हा क्र ीडा अधिकारी स्नेहल साळुंखे आदी उपस्थित होते.