पोलसात तक्रार करा आॅनलाईन, ठाणे पोलिसांचा स्मार्ट कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 08:05 PM2017-09-19T20:05:14+5:302017-09-19T20:05:32+5:30
मीरा भार्इंदरसह ठाणे ग्रामीण पोलीसांच्या अखत्यारीतील १७ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारया नागरिकांना आता पोलीसांच्या स्मार्ट कारभाराचा अनुभव घेता येणार आहे
मीरारोड, दि. 19 - मीरा भार्इंदरसह ठाणे ग्रामीण पोलीसांच्या अखत्यारीतील १७ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारया नागरिकांना आता पोलीसांच्या स्मार्ट कारभाराचा अनुभव घेता येणार आहे. नव्याने अद्यावत केलेल्या पोलिसांच्या www.thaneruralpolice.gov.in संकेतस्थळावरुन नागरिकांना थेट आॅनलाईन तक्रार करता येणार आहे. शिवाय भाडेकरुची माहिती देणे व कागदपत्रं, मोबाईल आदी हरवल्याची किंवा सापडल्याची माहिती वा तक्रार सुध्दा थेट आॅनलाईन नोंदवण्याची सोय केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी या बाबत माहिती देताना सांगीतले की, ठाणे ग्रामीण पोलीसांचे संकेतस्थळ नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. अद्यावत करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर आता नागरिकां करीता महत्वाच्या सुविधा उपलबध्द करुन देण्यात आल्या आहेत. मराठी व इंग्रजी भाषेत हे संकेतस्थळ असेल असे डॉ. पाटील म्हणाले. या वेळी अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत कदम, उपमहापौर चंद्रकांत वैती, उपअधिक्षक नरसिंह भोसले, वरिष्ठ निरीक्षक विलास सानप, राम भालसिंग, राजेंद्र कांबळे, वैभव शिंगारे, प्रविण साळुंके आदि अधिकारी उपस्थित होते.
संकेत स्थळावर सापडले वा हरवले या आॅप्शन मध्ये नागरिकांना त्यांचा मोबाईल तसेच वाहन परवाना, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शिधावाटप पत्रिका, शैक्षणिक वा अन्य कागदपत्रे हरवल्यास त्याची तक्रार आता आपल्या मोबाईल मधुन वा संगणका वरुन करता येणार आहे. या शिवाय मोबाईल वा उपरोक्त कागदपत्रं, ओळखपत्रं सापडल्यास त्याची माहिती सुध्दा जागरुक नागरिक आॅनलाईन पोलीसांना देऊ शकणार आहे.
या मुळे नागरिकांना आता पोलीस ठाण्याच्या खेपा माराव्या लागणार नाहीत. हद्दीच्या वादा वरुन पोलीस ठाण्यात केली जाणारी टोलवाटोलवी तसेच शपथपत्र देण्याच्या जाचातुन नागरिकांची सुटका होणार आहे.
हरवल्याची तक्रार देताना संकेतस्थळावर दिलेली माहिती परीपुर्ण भरायची आहे. त्यानंतर मोबाईल वर प्राप्त ओटीपी भरल्यावर तक्रारीची नोंद होईल. शेवटी मोबाईल किंवा कागदपत्रं हरवल्या बद्दलचा डिजीटल सही असलेला दाखला तक्रारदाराच्या ईमेल वर तत्काळ प्राप्त होणार आहे. त्याची एक प्रत संबंधित पोलीस ठाण्याला सुध्दा ईमेलनेच पोच होणार आहे.
घर मालकाने मालकीचे घर अथवा जागा भाड्याने दिल्यास भाडेकरुची माहिती पोलीसांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु पोलीस ठाण्यात त्यासाठी लावला जाणारा वेळ, द्यावी लागणारी चिरीमीरी, दलालांची रेलचेल आदीं मुळे घरमालक व भाडेकरु भरडले जातात. त्यामुळे घरमालक व भाडेकरु पोलीस ठाण्या कडे जाणे टाळतात.
नागरिकांचा हा जाच सुध्दा दूर करण्यासाठी संकेतस्थळावर भाडेकरुची माहिती हे आॅप्शन देण्यात आले आहे. या द्वारे आॅलाईन माहिती भरल्यावर मोबाईलवर ओटीपी प्राप्त होऊन घरमालकाची भाडेकरु बाबतची नोंद होईल. नंतर त्यांच्या ईमेल वर तत्काळ डिजीटल सहीचा दाखला प्राप्त होणार आहे.
नागरिकांना संकेतस्थळावर आता आॅनलाईन तक्रारीची सोय सुध्दा उपलबध्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता पोलीस ठाण्यात न जाताच आपल्या मोबाईल वा संगणका वरुन आपली तक्रार नोंदवता येणार आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर उपलब्ध आॅप्शन मध्ये जाऊन परिपुर्ण माहिती अर्जात भरायची आहे. आपली तक्रार तेथेच नोंदवायची आहे. सर्व माहिती अचुकपणे भरल्यावर मोबाईल वर आलेला ओटीपी सादर केल्यावर तक्रार नोंदवली जाईल. तक्रारी बद्दल पोलिस ठाण्या कडुन केलेल्या कारवाईची माहिती ईमेलवरच तक्रारदारास पाठवली जाईल. दखलपात्र गुन्हा आदी बद्दल तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावुन आवश्यक प्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
पासपोर्ट पडताळणी बद्दल देखील एमपासपोर्ट योजना सर्व पोलिस ठाण्यां मध्ये राबविण्यात आली आहे. या मुळे अर्जदार नागरिकास आता पडताळणीसाठी पोलिस ठाण्यात जावे लागणार नाही. प्रत्येक पोलिस ठाण्यास या बाबत टॅब देण्यात आला असुन पोलिस कर्मचारी अर्जदाराच्या घरी जाऊन पडताळणी करेल व रहिवासी पुरावे आदी तत्काळ आॅनलाईन अपलोड करणार आहे. या मुळे अवघ्या ५ ते ६ दिवसात पडताळणी प्रक्रिया पुर्ण होणार आहे.
या सर्व प्रक्रियां मध्ये पेपरलेस कामकाजा मुळे कागदांचा वापर कमी होईल. नागरिकांचा वेळ सुध्दा वाचणार असुन त्यांचा अनावश्यक जाच सुध्दा टळणार आहे.