मंदिराच्या जमिनीवर दारूचे दुकान, मोर्वा येथील राधाकृष्ण मंदिराच्या ट्रस्टींची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:50 AM2018-12-25T02:50:54+5:302018-12-25T02:51:05+5:30
मीरा रोड : भार्इंदरच्या मोर्वा गावातील राधाकृष्ण मंदिर देवस्थानच्या जागेवर स्थानिक गावपंच मंडळाच्या अध्यक्षानेच अतिक्रमण करून दारूच्या दुकानासह अन्य ...
मीरा रोड : भार्इंदरच्या मोर्वा गावातील राधाकृष्ण मंदिर देवस्थानच्या जागेवर स्थानिक गावपंच मंडळाच्या अध्यक्षानेच अतिक्रमण करून दारूच्या दुकानासह अन्य बेकायदा बांधकामे केल्याची तक्रार ट्रस्टींनी महापालिकेकडे केली आहे. देवस्थानच्या जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून त्यामुळे गावात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मोर्वा गावातील श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थानची सर्व्हे क्र. ५९ ही जमीन आहे. त्यापैकी ७३० वार जमीन १९९० साली गौरूबाई पाटील व इतरांना बदली व्यवहाराने द्यायची व त्या बदल्यात मंदिराजवळील पाटील यांची तेवढीच जमीन देवस्थानला हस्तांतरित करायची, असे ठरले होते. त्यावेळी सदर व्यवहार नोंदणीकृत केला नव्हता. गावातीलच गावपंच मंडळाचे अध्यक्ष आणि मंडप डेकोरेटर व्यावसायिक जगदेव म्हात्रे यांनी गौरूबाई व कुटुंबीयांशी परस्पर व्यवहार करून देवस्थानच्या मालकीच्या जागेत १४ खोल्या, मोबाइल टॉवर व बीअर शॉप उभारले. देवस्थानची जागा असताना २००५ पासून या बांधकामांची करआकारणी म्हात्रे यांनी स्वत:च्या नावाने करून घेतली. गौरूबाई व इतरांच्या मालकीची मंदिराजवळची जागा देवस्थानला देणे अपेक्षित असताना, त्या कुटुंबाने म्हात्रे यांना जागा विकली. तसा करारनामा २०१६ साली करण्यात आला. ही बाब ट्रस्टींना कळल्यानंतर त्यांनी म्हात्रे यांना जागा देवस्थानच्या नावे करून देण्यास तगादा लावला. पण, जमीन बदली व्यवहारासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी आणा. मी जमीन देवस्थानच्या नावावर करायला तयार असल्याचे म्हात्रे यांनी कळवले. ट्रस्टने याप्रकरणी पालिकेकडे तक्रार करून म्हात्रे यांनी देवस्थानच्या जागेत बेकायदा १४ खोल्यांचे बांधकाम केले असून त्यात बीअर शॉप व मोबाइल टॉवरचा समावेश असल्याने त्यावर तोड कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालिकेने बेकायदा बांधकामांना नियमबाह्य व संगनमताने करआकारणी केली असून ती रद्द करण्याची मागणीसुद्धा ट्रस्टने केली आहे.
पालिकेच्या नगररचना विभागाने सदर जागेत बांधकाम परवानगी दिली नसल्याचे लेखी पत्र दिले आहे. प्रभाग समिती-१ च्या करनिरीक्षक यांनी तर माहिती अधिकारात उत्तर देताना मिळकतीचा बोध होत नाही व माहिती देणे अडचणीचे होत असल्याचे लेखी दिले आहे. करआकारणी करण्यासाठी जोडलेली कागदपत्रेच उपलब्ध नसल्याचे नमूद करत केवळ म्हात्रे यांच्या नावे करआकारणी असलेल्या १४ मालमत्तांचा तक्ताच त्यांनी दिला आहे.
प्रशासनाकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप
देवस्थानची जागा बळकावून त्यावर बेकायदा बांधकामे जगदेव म्हात्रे यांनी केली. पालिकेशी संगनमत करून नियमबाह्यपणे करआकारणी केली. जमीन बदलीचा व्यवहार न करता परस्पर गौरूबाई व कुटुंबाकडून जमीन खरेदी करून गावाची फसवणूक केली आहे. पालिका, महसूल तसेच पोलीसदरबारी म्हात्रेंचे वजन असल्याने तक्रारी करूनसुद्धा कुणी कारवाई करत नाही. ट्रस्टच्या जमिनीवरील बांधकामे तोडून पालिकेने जागा मोकळी करून द्यावी. अन्यथा, ग्रामस्थ आंदोलन करतील.
- रमेश पाटील, अध्यक्ष, राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट
गावासाठी आजपर्यंत शक्य तेवढे योगदान मी देत आलो आहे. देव राधाकृष्ण आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादाने माझी प्रगती झाली असून मी खरेदी केलेली मंदिराजवळील जमीन गावासाठी मोकळीच ठेवलेली आहे. ती ट्रस्टच्या नावे करून देण्यासाठी ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांची मंजुरी आणली पाहिजे. ती न आणता उलट द्वेषबुद्धीने ट्रस्टींनी असे प्रकार करून गावाची बदनामी करू नये.
- जगदेव म्हात्रे, अध्यक्ष, गावपंच मंडळ