भाजपाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:29 AM2019-03-15T01:29:47+5:302019-03-15T01:30:04+5:30
सोशल मीडियावरही प्रचार केल्याचा आरोप
मीरा रोड : आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भूमिपूजन करून सोशल मीडियावर प्रचार-प्रसार केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. १० मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भार्इंदर पश्चिमेच्या रत्नप्रिया कॉम्पलेक्स येथे भाजपा आमदार नरेंद्र मेहता, सभापती डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल आणि नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी गटाराच्या कामाचे भूमिपूजन केले. आपल्यासमोरच हा कार्यक्रम झाल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.
याशिवाय, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी पालिका शाळेच्या डिजिटल क्लासचे उद्घाटन आणि भानुशाली यांनी एका चौकाचे उद्घाटन आ. मेहता व अन्य नगरसेवकांसह केल्याची पोस्ट छायाचित्रांसह फेसबुकवर टाकली होती. पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने आयोगाकडे लेखी तक्रार करावी लागल्याचे गुप्ता म्हणाले. या तक्रारीनंतर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तक्रारदारासह अधिकाऱ्यांची सुनावणी घेतली.
कळवा, मुंब्य्रात कोनशिला जैसे थे
मुंब्रा : सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या आचारसंहितेचा कळवा, मुंब्य्रात अनेक ठिकाणी भंग होत आहे. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये देशात सतराव्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वी रविवारी केली. त्याचक्षणी देशात आचारसंहिता सुरू झाली.
आदर्श आचारसंहितेनुसार सार्वजनिक ठिकाणी पक्ष, त्यांची चिन्हे, नेत्यांची नावे, त्यांनी केलेल्या कामांचे जाहीर प्रदर्शन करण्यावर बंदी आहे. परंतु कळवा, मुंब्य्रात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे ठळकपणे मतदारांच्या नजरेस पडत आहेत.
या भागात अनेक प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्यात आले. त्यांचे लोकार्पण करताना नेत्यांच्या नावांच्या कोनशिला बसवण्यात आल्या होत्या. मात्र, आचारसंहिता सुरू असतानाही अनेक कोनशिलांवर आच्छादन टाकलेले नाही. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रविवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होण्याआधी आम्ही उद्घाटन व भूमिपूजन केले. फेसबुकवर कर्मचाऱ्यांनी दुसºया दिवशी पोस्ट टाकल्या. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी असून आचारसंहितेचा भंग केलेला नाही. तक्रारीत तथ्य नाही.
- ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक