प्रदूषणाविरोधात मंडळाचीच तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:50 PM2018-02-23T23:50:25+5:302018-02-23T23:50:25+5:30
खंबाळपाडा नाल्यातील प्रदूषण वाढत असल्याने बेकायदा प्लास्टिक पिशव्या, ड्रम धुवून ते वाढवणाºयांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने बडगा उगारला आहे
डोंबिवली : खंबाळपाडा नाल्यातील प्रदूषण वाढत असल्याने बेकायदा प्लास्टिक पिशव्या, ड्रम धुवून ते वाढवणाºयांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने बडगा उगारला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांसोबत कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
कांचनगाव खंबाळपाडा येथे मॉडेल कॉलेजच्या मागील बाजूला अजिउल्लाह खान याने भाड्याने जागा घेतली आहे. ही जागा चिंतामणी पाटील यांच्या मालकीची आहे. या जागेत खान हा प्लास्टिक पिशव्या, घनकचरा, रसायनांचे ड्रम अधिकृतपणे नाल्यालगत धुतो. त्यामुळे पिशव्या, ड्रममधील घातक रसायन व घनकचरा हा खंबाळपाडा नाल्याला जाऊन मिळतो. याशिवाय काही रासायनिक कचरा अनधिकृतपणे जाळला जातो. अशास्त्रीय पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचा उद्योगच खान याने थाटला आहे. त्यामुळे वायू व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेत खंबाळपाडा ते ठाकुर्ली परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. त्यामुळे खंबाळपाडा परिसरातील नागरिकांकडून प्रदूषणाच्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्या जातात. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर वनमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरासमोर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन दररोज १५ दशलक्ष लीटर पाणी खंबाळपाडा नाल्यात सोडले जाते. त्यानंतरही नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारी का येतात, त्याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला. तेव्हा खान बेकायदेशीररित्या कचरा जाळून तसेच पिशव्या व ड्रम धूवून खंबाळपाडा नाला प्रदूषित करीत असल्याचे उघड झाले. पंधरा दिवसापूर्वीच खंबाळपाड्यात टँकरद्वारे बेकायदा रसायन सोडणाºया सह्याद्री कंपनीविरोधात बंदची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. या कंपनीत मणी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन प्रक्रिया न करताच थेट नाल्यात सोडण्यात आले होते. कंपनीचा टँकरही जप्त केला होता. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रदूषण कायद्यान्वये संबंधितांविरोधात पोलीस गुन्हा दाखल करु शकतात. अवैध धंदे या कलमाखालीही गुन्हा दाखल होऊ शकतो. याशिवाय महापालिका अधिनियमात अवैध धंदे बंद करण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा आधार घेऊन आयुक्त कारवाई करतात की नाही, हे आता महत्वाचे ठरेल.
२००५ च्या अतिवृष्टीत पुराच्या वेळी वालधुनी नदीशेजारील बेकायदा भंगार दुकानांना टाळे ठोकण्याची कारवाई तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केली होती.