महिला पोलीस अधिका-याविरुद्ध तक्रार, दोन वर्षांपूर्वींचा मारहाणीचा गुन्हा : कौटुंबिक हिसाचाराचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:00 AM2017-11-15T02:00:29+5:302017-11-15T02:00:52+5:30
कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करणा-या एका महिलेच्या पतीला कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता काळबांडे यांनी चक्क पट्टा आणि रॉडने मारहाण केली होती.
ठाणे : कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करणा-या एका महिलेच्या पतीला कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता काळबांडे यांनी चक्क पट्टा आणि रॉडने मारहाण केली होती. याबाबतची तक्रार आता घाटकोपर येथील रहिवाशी रवींद्र जाधव यांनी दोन वर्षांनंतर दाखल केली आहे.
रवींद्र जाधव यांची पत्नी सुवर्णा यांनी त्यांच्या पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर रवींद्र यांनीही ठाण्याच्या कौटुंबिक न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तो अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. सुवर्णा यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा न करता तत्कालीन निरीक्षक काळबांडे आणि सुवर्णा यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून शिवीगाळ केली. त्यानंतर काळबांडे यांनी पेपरवेट मारून पट्टा आणि रॉडने मारहाण केल्याचे जाधव यांनी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार १३ मे २०१५ ते १७ जून २०१५ या कालावधीत घडल्याचा दावा जाधव यांनी केला.