बीडच्या सेक्स रॅकेटमधील दोघे गुन्हेगार खुनातील आरोपी, एकाच तरुणीवर ४० जणांनी अत्याचार केल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 10:26 PM2017-10-02T22:26:58+5:302017-10-02T23:36:15+5:30
कल्याणमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या ताजमुल शेख आणि युनूस शेख या दोघांनी पश्चिम बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार बीड शहर पोलिसांनी उघड केला आहे. कल्याणमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या ताजमुल शेख आणि युनूस शेख या दोघांनी पश्चिम बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार बीड शहर पोलिसांनी उघड केला आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : कल्याणमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या ताजमुल शेख आणि युनूस शेख या दोघांनी पश्चिम बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार बीड शहर पोलिसांनी उघड केला आहे. यामध्ये आणखी अनेक मुलींची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम बंगालहून कामासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आलेल्या एका अल्पवयीन विवाहितेला काही दिवसांपूर्वी पैशांचे आमिष दाखवून बीडला नेण्यात आले. तिथे तिची काही हजारांमध्ये विक्री करून ताजमुलने पलायन केले होते. बीडमधील एका आंटीने त्यासाठी युनूसच्या बँक खात्यात पैसेही भरले. हे पैसे मिळाल्यानंतर तब्बल ४० जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
दरम्यान, या विवाहितेने कल्याणमध्ये असलेल्या आपल्या पतीशी संपर्क साधून ही आपबिती कथन केली. त्यानंतर, त्याने बीड शहर पोलिसांशी संपर्क साधून याबाबत तक्रार दाखल केली. बीडचे पोलीस उपअधीक्षक सुधीर किरडकर, पोलीस निरीक्षक सुलेमान सय्यद यांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे बीडच्या शिवाजीनगर भागातील एका बंदिस्त खोलीतून २७ सप्टेंबर रोजी या विवाहितेची सुटका केली. त्यानंतर, तिने दिलेल्या माहितीनुसार या प्रकाराचा भंडाफोड झाला. पीडित विवाहितेची फेसबुकवरून मुनंता शेख नामक व्यक्तीशी ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. मुनंताने पीडितेला ताजमुल शेखची ओळख करून दिली. ताजमुल ज्या खोलीत राहत होता, तेथेच काही दिवस हे जोडपे राहिले होते. हीच फेसबुकची मैत्री पीडितेच्या अंगलट आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याणमधून दोघांना अटक
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना निरीक्षक सुलेमान यांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी कल्याणमधून युनूस आणि ताजमुल या दोघांना अटक केली, तर बीडमधून शरीरविक्रयाचा व्यवसाय चालवणा-या दोन महिलांनाही अटक केली आहे. या महिलांना ७ आॅक्टोबर, तर युनूस आणि ताजमुल याला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
...............
ताजमुल आणि युनूस खुनातील आरोपी
दरम्यान, यातील ताजमुल आणि युनूस या दोघांनाही यापूर्वी २०१४ मध्ये एका बांगलादेशीच्या खून प्रकरणात मानपाडा (डोंबिवली) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी अटक केली होती. या प्रकरणात त्यांची जामिनावर सुटका झाल्याने ते पुन्हा दलालीच्या व्यवसायाकडे वळले. कल्याणच्या लोढा हेवन भागातील काटईनाक्याजवळ एका बांगलादेशी व्यक्तीचा खून करून मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. त्या बांगलादेशीच्या पत्नीला (विवाहापूर्वी) या दोघांनी त्या वेळी शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलले होते. मात्र, तिने हा व्यवसाय झुगारून या बांगलादेशी व्यक्तीशी विवाह केला होता. याच रागातून त्याची युनूस आणि ताजमुल यांनी हीहत्या केली होती. अर्थात, या हत्येनंतरही त्यांनी याच व्यवसायात आपला जम बसवून अनेक बांगलादेशी तसेच परप्रांतीय मुलींना शरीरविक्रयाच्या व्यवसायात ओढल्याची माहिती तपासात उघड होत आहे.
.......................
व्हॉट्सअॅपद्वारे विक्री
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांनी या पीडित विवाहितेचा फोटो काही तरुणांना दाखवला. त्याचद्वारे त्यांनी तिचा अनेकांशी सौदा केला. ज्यांना हे फोटो आवडायचे, त्यांच्या पसंतीनुसार त्यांनी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तिच्याप्रमाणेच अशा अनेक मुलींचा शरीर विक्रयासाठी ‘सौदा’ झाल्याची शक्यता असून यात आणखी किती जणींना ओढण्यात आले आहे, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
------------------------
व्हॉटसअॅपवर फोटो व्हायचे व्हायरल
सुरुवातीला पैशाचे तसेच चांगल्या पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून पश्चिम बंगालच्या मुलींना जाळयात ओढले जाते. त्यांचीच महाराष्ट्रातील बीडसह वेगवेगळया ठिकाणी शरीरविक्रयासाठी विक्री केली जाते. ज्या मुलींना किंवा विवाहितांना या जाळयात ओढले जायचे. त्यांची मानसिक तयारी करुन किंवा त्यांच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले जातात. याच व्यवसायासाठी त्यांची पूर्णपणे तयारी केल्यानंतर त्यांचे फोटो काढले जातात. ते व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविले जातात. ज्यांना यातील फोटो आवडायचे त्यांच्याकडून एक हजार ते पाच हजारांपर्यंत सौदा केला जायचा. जिचा फोटो निवडला जाईल, तिला संबंधित गि-हाईकाकडे पाठविले जाते, अशी माहिती चौकशीत समोर आल्याची माहिती बीड पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली.