शिवीगाळी केल्याने महापौर जावेद दळवी विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:31 PM2018-01-29T22:31:36+5:302018-01-29T22:36:15+5:30
भिवंडी : महानगरपालिकेमार्फत गैबीनगर भागात सुरू असलेल्या तोडफोड संदर्भात विचारणा करण्यास गेलेल्या व्यक्तीस महापौरांनी शिवीगाळी करीत कार्यालयाबाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने आज सायंकाळी निजामपूर पोलीस ठाण्यात महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
महानगरपालिके मार्फत शहरात रस्ता रूंदीकरणाच्या निमीत्ताने वारंवार तोडू कारवाई करण्यात येते. अशा वेळी बांधकाम विभाग व शहर विकास विभागामार्फत नागरिकांच्या तोडलेल्या मालमत्तेचा पंचनामा त्याचवेळी देण्यात येत नाही. तसेच नियमांप्रमाणे पर्यायी जागा व मोबदला देण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अशा तोडू कारवाईस शहरातील नागरिक पालिका प्रशासनास सहकार्य करीत नाही.
शहरातील नागरिकांना शहराचा विकास आराखडा पहावयांस मिळावा यासाठी हा विकास आराखडा पालिकेच्या दर्शनी भागात लावण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. परंतू प्रशासनाने याची दखल घेतली नाही.त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांमध्ये गैरसमज पसरले आहेत. त्या अनुषंगाने शांतीनगर रोडवरील गैबीनगर भागात सुरू असलेल्या तोडू कारवाई संदर्भात परिसरातील काही नागरिक आज सोमवार रोजी सायंकाळी महापौर दालनात माहिती घेण्यासाठी व बातचीत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी गैबीनगर येथील सिध्दीक हाजी मोहम्मद शफी मोमीन याने महापौर दालनात जाऊन तोडू कारवाईबाबत महापौर जावेद दळवी यांच्याकडे तोंडी तक्रार केली. तेंव्हा दळवी यांनी त्यास लेखी तक्रार देण्यास सांगीतले. मात्र लेखी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याचे प्रत्युत्तर सिध्दीक मोमीन याने महापौरांना दिल्याने दोघांमधील वाद वाढून त्यांनी एकमेकांना शिवीगाळी केली.त्याचवेळी महापौरांनी सिध्दीक मोमीन याला शिपायांमार्फत आपल्या दालनाबाहेर काढले.आपला अपमान केल्याचा राग येऊन सिध्दीक मोमीन याने महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीसांनी महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात महापौर जावेद दळवी विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.