महावितरणाच्या दुर्लक्षामुळे आमच्या घरात अंधार - स्थानिकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:22 AM2018-07-17T11:22:14+5:302018-07-17T11:37:15+5:30
डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रे नगरमध्ये सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता
डोंबिवली- डोंबिवली पूर्वेला रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या म्हात्रे नगरमध्ये सोमवारी (16 जुलै) रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणाच्या दुर्लक्षामुळे आमच्या घरात अंधार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परिसरातील ट्रान्सफॉर्मर निकामी झाला असून तो बदलण्याचे काम महावितरण करत आहे.
गेले 6 महिने स्थानिकांना हा त्रास होत होता. रोज पाणी यायच्या वेळेत वीजपुरवठा खंडित व्हायचा. गृहिणी, विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांची पंचाईत होत असल्याचं स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सांगितले. त्यामुळेच सोमवारी नवा ट्रांस्फ़ोर्म हवा ही मागणी करत पेडणेकर यांच्यासह रहिवाशांनी घरी न जाण्याचा पवित्रा घेतला. मध्यरात्री उशिरापर्यंत सगळे नागरिक रस्त्यावर उभे होते, अखेरीस कनिष्ठ अभियंता हर्षद म्हात्रे त्या ठिकाणी गेले, त्यांनी नागरिकांना आणि पेडणेकर यांस आश्वासन दिले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पहिले नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. म्हात्रे यांच्या आश्वासनानंतर नागरिक पहाटे तीननंतर घरी गेले.
म्हात्रे यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी सकाळी हे काम सुरू झाले असून पुढील दोन तासात वीजपुरवठा सुरळीत होणार असून नवा 500 केव्हीचा ट्रान्सफॉमर बसवण्याचे काम सुरू आहे. महावितरणाच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले होते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी या भागात आल्यावर नागरिकांची समस्या ऐकून घेत तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांची याबाबत कान उघडणी केली. त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येत आहे, अन्यथा जुन्याच निकामी झालेल्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून महावितरणाने वेळ मारून नेली असती अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवासी अमित कासार यांनी दिली.