माजी आमदारांविरोधात पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:46+5:302021-07-10T04:27:46+5:30
मीरारोड : मीरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. ...
मीरारोड : मीरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. शिवसेनेला संपवण्याची भाषा व ठाकरे घराण्यासह शिवसेनेचे संस्कार काढणाऱ्या, त्रास देणाऱ्या माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर कारवाईचा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. त्यावर लेखी तक्रारी घेऊन या. कारवाई करू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, नगरसेवक जयंतीलाल पाटील, राजू भोईर, दिनेश नलावडे, कमलेश भोईर, शर्मिला बगाजी, एलायस बांड्या आदींसह अन्य नगरसेवक, पदाधिकारी हे बुधवारी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर भेटण्यास गेले होते. सुमारे दोन-अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे यांनी सर्वांना बोलावले.
मीरा-भाईंदर महापालिकेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. अपक्ष आमदार गीता जैन या शिवसेनेसोबत आहेत. मात्र, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे ईडीच्या जाळ्यात अडकल्याने ते काही महिने शहरात आलेले नाहीत. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारच्या काळात तत्कालीन आमदार मेहता यांनी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना त्रास दिला. बाळासाहेबांच्या कलादालनाच्या कामास विरोध केला. श्रेय लाटण्यासाठी विकासकामांत अडथळले आणले. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचे गाऱ्हाणे शिंदे यांच्याकडे मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात आता आपले सरकार आहे. त्यामुळे अनेक गुन्हे दाखल असलेल्या मेहतांवर कारवाई का हाेत नाही, अशी नागरिक विचारणा करू लागल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली. यावर शिंदे यांनी लेखी तक्रारी आणून द्या, त्या पाहून कार्यवाही करू, असे म्हटल्याचेही सूत्रांनी सांगितले. सेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्याने या भेटीला दुजोरा दिला.