३० डिसेंबर ते २४ फेब्रुवारी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रात संपूर्ण स्वच्छतेची मोहीम

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 27, 2023 05:36 PM2023-12-27T17:36:32+5:302023-12-27T17:37:37+5:30

महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Complete cleanliness drive in Thane Municipal area from 30th December to 24th February | ३० डिसेंबर ते २४ फेब्रुवारी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रात संपूर्ण स्वच्छतेची मोहीम

३० डिसेंबर ते २४ फेब्रुवारी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रात संपूर्ण स्वच्छतेची मोहीम

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ( डीप क्लिन मोहीम) सुरूवात शनिवार, ३० डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम २४ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार, महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात ही मोहिम राबविण्यात येईल. या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबविली जाईल. शनिवार, ३० डिसेंबर २०२३ रोजी पहिली प्रभाग समिती आणि शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ नववी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबविण्यात येईल. संपूर्ण स्वच्छता मोहिमेत स्वच्छता, स्वच्छतेतील सातत्य आणि सुधारणा या तीन तत्वांचा समावेश आहे. दैनंदिन स्वच्छतेच्या पलिकडे कानाकोपऱ्यातील सफाई असे या मोहिमेचे स्वरुप आहे. ज्या स्वच्छतेसाठी विशेष परिश्रम करण्याची आवश्यकता असल्याने, दैनंदिन स्वच्छतेत ज्या कामांचा समावेश होत नाही, अशी सर्व कामे या मोहिमेत तडीला नेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ, जास्तीची यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात येईल. रस्ता झाडणे, रस्ता धुणे याच्यासह रस्ता सर्वांगीण साफ करणे असे या मोहिमेचे स्वरुप आहे. 
 
मोहिमेची व्याप्ती

या मोहिमेत रस्ते, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, रस्ते दुभाजक - मिडियन, फूटपाथ, फूटपाथ लगतच्या भिंती, तलाव, मैदाने, उद्याने, सार्वजनिक शौचालये, रेड स्पॉट, मार्केट आणि परिसर, बस स्टॉप, नाले, उघडी गटारे, रस्त्यावरील नाम आणि दिशादर्शक फलक, डी पी बॉक्स आणि परिसर, महत्त्वाची ठिकाणे, पुतळे, स्मारके, उड्डाणपूल आणि पूलांखालील जागा, सार्वजनिक वहिवाटीच्या सर्व जागा यांची साफसफाई करण्यात येईल. तसेच, सार्वजनिक शौचालयांच्या सफाईसह परिसर, शौचालयाकडे येणारा रस्ताही स्वच्छ केला जाईल. त्याचबरोबर, बेवारस वाहने हटवणे, अनधिकृत फलक, बोर्ड, होर्डिंग, लोंबकळणाऱ्या वायर्स काढणे आणि धूर फवारणी करणे यांचाही या मोहिमेत समावेश आहे.

मलवाहिन्या, चेंबर ओव्हरफ्लो होत असतील तर त्यांची सफाईही केली जाईल. रस्ते साफ करताना कचरा, धूळ, माती, डेब्रिज हटविण्यात यावे. रस्ते दुभाजक, कर्बस्टोन यांची सफाई करताना आवश्यकतेनुसार त्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे.

Web Title: Complete cleanliness drive in Thane Municipal area from 30th December to 24th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.