रिक्षात स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण
By admin | Published: November 7, 2015 02:41 AM2015-11-07T02:41:25+5:302015-11-07T02:41:25+5:30
शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत.
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत. या लावलेल्या कार्डने नागरिकांचा सुरक्षित प्रवासाबरोबर रिक्षांमध्ये विसरलेल्या वस्तू परत मिळू लागल्या आहेत. पण, प्रवास करताना नागरिक कार्डवरील माहितीची पूर्ण नोंद करीत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासात कार्डवरील इत्थंभूत माहितीची नोंद जरूर करून घ्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
रिक्षातील प्रवास सुरक्षित होण्यासाठी २०१४ मध्ये ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस आयुक्तालय परिसरातील सर्व रिक्षांमध्ये स्मार्टकार्डची
मोहीम हाती घेतली. मोहिमेंतर्गत
३२ हजार १५० रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्यात आले आहेत. या कार्डवरील माहितीच्या आधारे ठाणे शहर आणि डोंबिवली परिसरात रिक्षा प्रवासात हरवलेल्या वस्तू नागरिकांना परत मिळून देण्यात वाहतूक शाखेला यश येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.