आधी रखडलेले रस्ते प्रकल्प पूर्ण करा अन् मगच सहा पदरी रस्त्यांची घोषणा करा- राजेश कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:59 PM2017-12-04T19:59:33+5:302017-12-04T22:46:38+5:30
कल्याण-डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेचा नवीन रस्ता बांधणीचा इतिहास जर बघितला तर त्यांचे नाव वेळकाढू व जास्तीत जास्त वर्षं रस्त्याचे काम पूर्ण करणा-या जागतिक विक्रमात अव्वल स्थानी असेल.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेचा नवीन रस्ता बांधणीचा इतिहास जर बघितला तर त्यांचे नाव वेळकाढू व जास्तीत जास्त वर्षं रस्त्याचे काम पूर्ण करणा-या जागतिक विक्रमात अव्वल स्थानी असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वस्तुस्थितीचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच नव्याने भिवंडी-कल्याण फाटा ते शिळफाटा या सहापदरी रस्त्याची घोषणा करावी, असा टोला मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी लगावला. कदम यांनी नव्या प्रकल्पांच्या घोषणोवर टीकास्त्र करतांना हा निर्णय देखील बिल्डरधार्जिणा असल्याचे म्हटले.
पालकमंत्री शिंदेंना उद्देशून रखडलेल्या प्रकल्पांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गोविंदवाडी बायपास तब्बल 8 वर्षं तरीही अद्याप अपूर्ण, डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा ठाकुर्ली रेल्वे पूल व रस्ता 14 वर्षं तरीही अद्याप अपूर्ण, कल्याण पत्री पूल ते ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्ता 18 वर्षं अद्यापही अपूर्ण व सदर रस्त्याचे काम शिवसेनेच्याच एका मोठ्या पदाधिका-याने जागेचा योग्य मोबदला मिळावा म्हणून गेले 11 महिने अडवून ठेवल्याचे कळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रेती बंदर मानकोली खाडी पूल रस्ता काम सुरू, पण प्रगती वादात अडकल्याचे कळते, अजून किती वर्ष जातील माहीत नाही. कल्याण-ठाणे रेल्वे समांतर रस्ता, हा रस्ता गेले 20 वर्ष फक्त वचननाम्यापूर्ती दिसून येतो. अशी वर्षानुवर्ष अपूर्ण रस्त्यांची अनेक उदाहरणे देता येतील जी शिवसेनेच्या ढिसाळ सत्ता काळात अपूर्ण, रखडलेली, निकृष्ट व लागलेला वर्षांनुवर्षाचा कालावधी हे पाहता शिवसेनेचे नाव जागतिक विक्रमात नोंदावे लागेल, असेही ते म्हणाले. आता सहापदरी शीळफाट्याचे नवीन स्वप्न पालकमंत्री घेऊन आले, कारण पूर्वीचे एलिवेटेडचे स्वप्न मेट्रो 5 ने उडवले असेल, सहा पदरी करताना किती बांधकामे हटवावी लागतील ह्याची कल्पना त्यांना असेलच, असेही ते म्हणाले.
मध्यंतरी मागील आयुक्त ई.रविंद्रन ह्यांनी जे कल्याण शीळ रोड ला रस्ता रुंदीकरणाची धडक कारवाई केली होती, त्यावर हे सत्ताधारी शिवसेना रस्ता बांधू शकली नाही, सहा पदरी रस्ता तर खूप लांबची गोष्ट असल्याचे ते म्हणतात. सहापदरी रस्ता कराल तेव्हा कराल आधी गेले 8 महिने शिवसेनेने अडवलेला पत्रीपूल कचोरे खंबाळपाडा रेल्वे समांतर रस्ता पूर्ण करावा, असे आवाहनही कदम यांनी केले.