शहरातील रस्ते, शौचालय व शाळा दुरूस्तीची कामे ही 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

By अजित मांडके | Published: January 11, 2024 10:41 AM2024-01-11T10:41:22+5:302024-01-11T10:42:43+5:30

आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व कार्यकारी अभियंत्यांना निर्देश दिले.

complete repair works of roads toilets and schools in the city by january 31 commissioner abhijit bangar instructions | शहरातील रस्ते, शौचालय व शाळा दुरूस्तीची कामे ही 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

शहरातील रस्ते, शौचालय व शाळा दुरूस्तीची कामे ही 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहरात 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' अंतर्गत स्वच्छता, शौचालय, खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरण ही कामे हाती घेण्यात आली होती. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण, यूटीडब्ल्‌यूटी व डांबरीकरण पध्दतीच्या रस्त्याची हाती घेण्यात आलेली बहुतांश कामे  पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तसेच  शौचालयाचे नुतनीकरण, शाळा इमारत दुरूस्तीची कामेही सुरू आहेत. परंतु पावसाळ्यामुळे काही कामे थांबविण्यात आली होती. पावसाळ्यानंतर सदरची कामे सुरू झाली असून या कामाचा आढावा घेवून सर्व कामे 31 जानेवारी 2024 पूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिले.

महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध कामांचा प्रभाग समितीनिहाय आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सद्यस्थितीत सुरू असलेली सर्व कामे अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर जमीन महापालिकेची नसल्यामुळे काही कामास विलंब होत असल्याचे बैठकीत कार्यकारी अभियंत्यांकडून नमूद करण्यात आले. मात्र पावसाळ्यानंतर कामे विलंबाने तसेच टप्प्याटप्प्याने सुरू केल्याबाबत आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना याचा जाब विचारत याबाबत आवश्यक तो पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन सदर कामे युद्धपातळीवर पूर्ण होतील या दृष्टीने सर्वांनी सजग राहून काम करण्याचा इशारा दिला. तसेच रस्त्यांशी संलग्न असलेली कामे उदा. केबल्स, गॅस पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, महावितरणची केबल्स आदी कामे तातडीने पूर्ण होतील यासाठी देखील संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करुन पुढील कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. काही रस्त्यांची कामे अत्यंत समाधानकारक झाली असून तशाच प्रकारची कामे सर्वांकडून अपेक्षित असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

शौचालयांची कामे देखील 15 दिवसांत पूर्ण करावीत

महापालिका कार्यक्षेत्रात सर्वच प्रभागसमितीअंतर्गत विविध ठिकाणी शौचालयांच्या दुरूस्ती व नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा देखील उच्चप्रतीचा असेल या दृष्टीने सर्वांनी कटाक्ष ठेवावा. हाजुरी या ठिकाणचे सार्वजनिक शौचालयाच्या आजूबाजूचा परिसर हा सुशोभित करुन अत्यंत चांगल्या प्रकारचे काम झाले असल्याचे आयुक्तांनी बैठकीत नमूद करीत याच धर्तीवर सर्व शौचालयांची कामे विहित मुदतीत होतील या दृष्टीने कामे पूर्ण करावीत. सद्यस्थितीत शौचालयाची कामे 70 ते 75 टक्के पूर्ण झाली असली तरी येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पूर्ण करावीत असेही आयुक्त श्री.बांगर यांनी सांगितले.

शौचालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांशी संवाद साधावा

बहुतांश शौचालयांमध्ये शौचालयांची तोडफोड करणे, कडी कोयंडे काढून नेणे, दरवाजे तोडणे, शौचालयाचे भांडे फोडणे अशा गैरप्रकारामुळे शौचालयांची दुरावस्था होत असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी निदर्शनास आणले. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी स्थानिक स्तरावरील नागरिकांशी सुसंवाद साधून शौचालयाची जबाबदारी त्यांचेवर सोपविल्यास किंवा अशी कृत्ये करणारे गर्दुल्ले निदर्शनास आल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्‌याप्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल करण्यात यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. तसेच काही शौचालयांसाठी सुरक्षारक्षक नेमण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

शाळा इमारती या उच्चदर्जाच्या असाव्यात

शहराचा विकास करत असताना महापालिकेच्या शाळा देखील सुस्थितीत असणे आवश्यक आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबातील असतात, या मुलांना देखील चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावेत यासाठी आपल्या शाळा इमारती या जागतिक दर्जाच्या असल्या पाहिजेत, यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेले काम हे दर्जेदार होईल, यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. यासाठी जर अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल तर तो निधीही कमी पडू देणार नाही असेही त्यांनी नमूद केले. तर दिवा भागातील शाळा बांधकामाकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच सर्व शाळांमधील शौचालय देखील नियमित स्वच्छ राहतील याकडे लक्ष द्यावे. तसेच उर्वरित शाळांच्या दुरूस्ती व नुतनीकरणाबाबतचा आराखडा उपायुक्त शिक्षण यांनी तयार करावा असेही या बैठकीत आयुक्तांनी नमूद केले.

या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता विकास ढोले, रामदास शिंदे तसेच सर्व प्रभागसमितीचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Web Title: complete repair works of roads toilets and schools in the city by january 31 commissioner abhijit bangar instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.