सरिता दीक्षित लिखित ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कळवा येथे संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 04:09 PM2018-07-31T16:09:51+5:302018-07-31T16:09:51+5:30
मनोमय प्रकाशनच्या वतीने ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्री स्वामी समर्थ सभागृह, दत्तवाडी, खारीगाव येथे प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
ठाणे : आपण पाहिलेलं स्वप्न आणि ठरवलेलं ध्येय कसं साध्य करावं ,याविषयी माहिती करून देणारं सरिता दत्ता दीक्षित लिखित ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त नूतन बांदेकर, औद्योगिक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक डॉ.शिवांगी झरकर, संमोहनतज्ञ डॉ.मंगेश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शालेय शिक्षण खूप कमी असूनही एक यशस्वी ज्योतिष ते प्रेरणादायी पुस्तकाच्या लेखिका हा प्रवास कसा झाला हा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. “लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी आवर्जून घेतला जाणारा कोऱ्या पुस्तकाचा सुगंध काही आर्थिक परिस्थितीमुळे कधीच घेता आला नाही. पण दिवस तसेच राहत नाहीत आणि आज ध्येयसिद्धी या पुस्तकाच्या कोऱ्या पानांचा सुगंध घेताना आनंदाश्रू आवरत नाहीत.” असे बोलताना लेखिकेसोबत सर्वांचे डोळे पाणावले. नूतन बांदेकर यांनी पुस्तकाची रूपरेषा थोडक्यात मांडली आणि अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. अशा चांगल्या कार्याची दखल सर्वांनी घ्यावी, पुस्तकातून आलेले विचार अंगी बाणवावे असे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले.तसेच त्या पुढे म्हणाल्या की -लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात,त्यांना आकार द्यावा तशी ती घडतात. संस्कार मुलांना घडवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. आज शाळेत शिकवताना आता मोबाइल पासून मुलांना दूर कसं ठेवता येईल याच प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. मुलांच्या समुपदेशन करताना आईवडिलांनी अगोदर मुलांचे समुपदेशक व्हा असे सांगत उत्तम संस्कारांची आणि सुवचनांची तसेच प्रेरणादायी पुस्तकं मुलांना मराठी येत नाही म्हणून दुर्लक्षित करू नका त्यांना आवर्जून वाचून दाखवा त्यामुळे त्यांना पुस्तकांबरोबर मराठी भाषेचीही गोडी लागेल असे सांगितले.आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती जर असेल तर कोणतंही कार्य अवघड नाही मराठी मध्ये असे आत्मविश्वास पूर्ण कार्यक्रम आणि पुस्तकं यावीत आणि सर्व त्या पासून प्रेरित व्हावे आपलं जीवन अजून सार्थकी व्हावं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.समाजात अशी अनेक चांगली कामे होत असतात परंतु ती कधी पुढे येत नाहीत,लोकांपर्यंत पोहचत नाहीत.तर अशी कामे व्हावीत आणि ती लोकांपर्यंत पोहोचावीत,प्रकाशित व्हावीत. लोकांनाही चांगल्या गोष्टी हव्या असतात. डॉ मंगेश जोशी यांनी जीवनात संस्काराचं महत्व काय असतं याविषयी आपले मत व्यक्त केले. गेली २६ वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ.शिवांगी झरकर यांनी शिक्षणाचे महत्व सर्व वयोगटांसाठी कसे महत्वाचे आहे तसेच गरज आणि इच्छा यांतील फरक त्यांनी समर्पकतेने स्पष्ट केला. आधी ज्ञान कि आधी पुस्तक या विषयावर वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकत त्यांनी सर्वांची मने जिंकली. सुज्ञ वाचक आहेत म्हणून अशी पुस्तक प्रकाशित होतात अशी प्रतिक्रिया मनोमय प्रकाशनच्या मुग्धा दीक्षित आणि अश्विनी खाके यांनी दिली. या पुस्तकाच्या माध्यमातून या दोन तरुणी प्रकाशिका म्हणून प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.