अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ठाण्यात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 04:03 PM2018-07-15T16:03:56+5:302018-07-15T18:20:16+5:30
अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दुसरा मजला, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे पार पडले.
ठाणे: अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दुसरा मजला, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी शिक्षक चांगला नसेल तर विद्यार्थी हा कवितेपासून लांब राहतो असे आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाची सुरूवात अमूल पंडीत यांनी लिहीलेल्या कविता आणि गाण्यांनी झाली. पाऊस - पाऊस, व्हॉट्सअॅप, विसरुन जाणे, अजून सारे तसेच आहे, लग्न, अजूनही यांसारख्या कविता तर कळत नाही मला, कधी स्मरावे तू मजला अशी अनेक गाणी यावेळी सादर झाली. यावेळी अरुण म्हात्रे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, अभिनेते किरण करमरकर, नाट्यदिग्दर्शक विश्वास सोहोनी, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर भाटलेकर, लेखक माधव चिरमुले आणि लेखक, कवी अमूल पंडीत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ््याचे प्रास्ताविक संगीता पंडीत यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत अमूल पंडीत यांच्यासोबतच्या आठवणी, किस्से सांगितले. एका कविने दुसऱ्या कवीला छान म्हणणं कठिण असते असे म्हात्रे हे मिश्किलपणे सोहळ््याप्रसंगी म्हणाले. मला चित्रकला, कविता याबद्दल नेहमी कुतूहल वाटते. अनेक कलांचे क्लासेस असतात. परंतू येथे कविता शिकवून देता येते असा क्लास आजवर कुठे नाही. कविता ही सुचावीच लागते, ती यावीच लागते. सुचणं असते तिथे देव असतो अशा भावना व्यक्त करीत सोशल मीडियामुळे पुस्तक बघणं अवघड झाले आहे. परंतू मला पुस्तकाची प्रचंड आवड आहे, मी पुस्तकं वाचतो असे किरण करमरकर यांनी सांगितले. यानंतर विश्वास सोहोनी, प्रभाकर भाटलेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. माधव चिरमुले यांनी अमूल पंडीत यांच्या गीतांचा अल्बम निघावा अशी इच्छा व्यक्त केली. अश्लेषा पंडीत हिने कार्यक्रमाचे निवेदन केले.